टीम इंडियामध्ये मतभेद?
By admin | Published: February 19, 2015 02:29 AM2015-02-19T02:29:48+5:302015-02-19T02:29:48+5:30
संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोच डंकन फ्लेचर यांची उपेक्षा होत असल्याचे ते वृत्त खोडसाळ व निराधार असल्याचे टीम इंडियाने स्पष्ट केले आहे.
ते वृत्त निराधार : कोच फ्लेचर यांची रवी शास्त्रींकडून उपेक्षा
मेलबोर्न : संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोच डंकन फ्लेचर यांची उपेक्षा होत असल्याचे ते वृत्त खोडसाळ व निराधार असल्याचे टीम इंडियाने स्पष्ट केले आहे.
भारताने एक दिवसाचा ब्रेक घेतला त्या वेळी सर्व खेळाडू विश्रांती घेत होते. याच वेळी संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी सहयोगी स्टाफची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीची माहिती फ्लेचर यांना नव्हती. त्यांना डावपेच आखण्यापासून अलिप्त ठेवले जात असल्याचे वृत्त मीडियाने प्रकाशित केले. यावर टीमचे मीडिया मॅनेजर डॉ. आर. एन. बावा म्हणाले, ‘‘अशी कुठलीही बैठक झालीच नाही. वृत्त कपोलकल्पित आहे.’’ फ्लेचर यांचे महत्त्व कमी करण्यासाठीच बीसीसीआयने शास्त्री यांची नियुक्ती केल्याचे मानले जात आहे.
संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाचे गोलंदाजी कोच भारत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर हे मित्रांना भेटण्यासाठी निघून गेले होते, त्याच वेळी ही बैठक पार पडली. याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारतात असलेले बोर्डाचे एक अधिकारी म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या गोष्टी करीत फ्लेचर यांना ‘साईडट्रॅक’ करण्याची गरज आहे, असे तुम्हाला वाटते काय? त्यांचा करार विश्वचषकापर्यंत आहे. जी व्यक्ती विश्वचषकानंतर स्वत: जाणार तिला अशा हरकती करून हकलण्याची काही गरज नाही.’’ (वृत्तसंस्था)