कुंबळेची जागा भरून काढणे कठीण - वीरेंद्र सेहवाग
By admin | Published: June 21, 2017 09:44 PM2017-06-21T21:44:21+5:302017-06-21T21:44:21+5:30
भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबऴेच्या राजीनामानाट्यानंतर प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत असलेल्या वीरेंद्र सेहवागने प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबऴेच्या राजीनामानाट्यानंतर प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत असलेल्या वीरेंद्र सेहवागने प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल कुंबळेच्या राजीनाम्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावर निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे, असे वीरूने म्हटले आहे.
वीरू म्हणाला की, " मी प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली खेळलो नाही. पण त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. तो माझा सिनियर होता. इतकेच नाही तर माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन त्याच्याच कर्णधारपदाखाली झाले होते. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली आहे. आता त्याच्या राजीनाम्यानंतर जो कोणी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारेल, त्याच्यासाठी कुंबळेसारखी कामगिरी करणे कठीण असेल."
अनिल कुंबळेने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. कुंबळे प्रशिक्षक म्हणून यशस्वी ठरला असला तरी त्याला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत चांगले संबंध राखता आले नव्हते. अखेर परिस्थिती चिघळल्यावर त्याने संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला.