मुंबईची कठीण परीक्षा
By admin | Published: May 13, 2015 11:23 PM2015-05-13T23:23:17+5:302015-05-13T23:23:39+5:30
सलग पाच शानदार विजयांसह जबरदस्त फॉर्ममध्ये आलेल्या मुंबईचा अश्व बंगळुरूने १० मेला झालेल्या सामन्यात रोखला. या वेळी एबी डिव्हिलियर्स आणि
मुंबई : गतसामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या पराभवाने प्ले आॅफसाठी खडतर मार्ग झालेल्या मुंबई इंडियन्ससमोर आज घरच्या मैदानावर गतविजेते कोलकाता नाइट रायडर्सचे कडवे आव्हान असेल. प्ले आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला या सामन्यात फक्त विजय आवश्यक नसून, धावगती वाढवण्याचेदेखील आव्हान असेल. त्यामुळेच मुंबईला सर्वोत्तम खेळाशिवाय दुसरा पर्याय नसेल; तर केकेआर मात्र पहिल्या दोन क्रमांकामध्ये स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात असेल.
सलग पाच शानदार विजयांसह जबरदस्त फॉर्ममध्ये आलेल्या मुंबईचा अश्व बंगळुरूने १० मेला झालेल्या सामन्यात रोखला. या वेळी एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्या दांडपट्ट्यापुढे मुंबईकर गोलंदाजांच्या मर्यादा पुन्हा एकवार स्पष्ट झाल्या. त्यामुळे मुंबईचे पहिले उद्दिष्ट असेल ते अचूक गोलंदाजीचे. बंगळुरूविरुद्ध जसप्रीत बुमराह
आणि हार्दिक पांड्या या दोघांना
५० हून अधिक धावांचा चोप बसल्याने या दोघांपैकी एकाला आजच्या सामन्यात बाहेर बसावे लागेल हे नक्की. केवळ लसिथ मलिंगा
चांगली गोलंदाजी करीत
असून, मुंबईने अद्यापही कर्नाटकचा अनुभवी वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनला खेळवले नाही. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता वाटते.
फलंदाजीच्या दृष्टीने लिंडल सिमेन्स आणि धडाकेबाज केरॉन पोलार्ड यांचा फॉर्म मुंबईला सुखावत असेल. सलामीवीर पार्थिव पटेलही चांगल्या लयीत दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा मात्र चाचपडताना दिसत असून त्याच्या फॉर्मची सध्या संघाला अत्यंत आवश्यकता आहे. एकदा का रोहित शर्मा फॉर्ममध्ये आला तर तो काय करू शकतो, हे प्रतिस्पर्धी संघालादेखील माहीत असल्याने त्यांचे प्रमुख लक्ष रोहितला लवकरात लवकर बाद करणे हेच असेल.
दुसऱ्या बाजूला केकेआरने हैदराबाद, दिल्ली आणि पंजाब या संघांना मोक्याच्या वेळी पराभूत करून अव्वल तीन संघांत स्थान मिळवले आहे. त्यामुळे मुंबईला हरवून पहिल्या दोन संघंत स्थान मिळवण्याचे मुख्य लक्ष केकेआरचे आहे. कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, युसूफ पठाण आणि आंद्रे रसेल यांच्यामुळे केकेआरची फलंदाजी मजबूत बनली आहे. तर गोलंदाजीमध्ये उमेश यादव आणि रसेल यांच्यासोबतच धोकादायक सुनील नरेन आणि ब्रॅड हॉग यांची जादुई गोलंदाजीदेखील मुंबईची ‘फिरकी’ घेऊ शकते.
घरच्या मैदानावर यंदाच्या सत्रातील शेवटचा सामना खेळणारा मुंबई संघ १२ गुणांसह सहाव्या स्थानी असून, १७ मेला मुंबई शेवटचा साखळी सामना हैदराबादविरुद्ध खेळेल. त्याच वेळी कोलकाता १५ गुणांसह चेन्नईपाठोपाठ दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. (क्रीडा प्रतिनिधी)