दिंडा ठरला सर्वांत ‘महागडा’ गोलंदाज
By admin | Published: April 8, 2017 12:43 AM2017-04-08T00:43:28+5:302017-04-08T05:48:35+5:30
‘आयपीएल’च्या दहाव्या सत्रात विजयी सलामी दिलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सला नमवले.
पुणे : ‘आयपीएल’च्या दहाव्या सत्रात विजयी सलामी दिलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सला नमवले. मात्र, हा सामना पुण्याच्या अशोद दिंडासाठी खूप कठीण गेला. विशेष म्हणजे डावातील अखेरच्या षटकात ३० धावांची खैरात केलेला दिंडा आतापर्यंतचा सर्वांत महागडा गोलंदाज ठरला. त्यात दखल घेण्याची बाब म्हणजे डावातील अखेरच्या अव्वल ५ महागड्या षटकांपैकी ३ षटके दिंडाने टाकली आहेत.
गुरुवारी झालेल्या सामन्यात पुण्याने मुंबईला ७ विकेट्सने नमविले. मात्र, या सामन्यात दिंडाने पहिल्या डावात टाकलेले अखेरचे षटक चांगले गाजले. दिंडाच्या या अखेरच्या षटकात मुंबईच्या हार्दिक पांड्याने तुफानी फटकेबाजी करताना तब्बल ३० धावांची धुलाई केली. यासह हे षटक आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडे अखेरचे षटक ठरले. या सामन्यात चार षटके टाकताना दिंडाने १४.२४ अशा अत्यंत वाईट इकॉनॉमी रेटसह ५७ धावांची खैरात केली. या कामगिरीसह दिंडा आयपीएलमध्ये डावातील अखेरच्या षटकात सर्वाधिक धावा देणारा ‘नंबर वन’ गोलंदाज ठरला.
नुकताच झालेल्या या सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने दिंडाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर त्याने सलग दोन षटकार आणि एक चौकार मारत २२ धावा कुटल्या. पाचव्या चेंडूवरही पांड्याने षटकार मारला. यावेळी ५ चेंडूत २८ धावा झाल्यानंतर दिंडाने एक वाइड टाकला आणि अखेरच्या चेंडूवर मुंबईला बायच्या रुपाने एक धाव अतिरिक्त मिळाली. यासह दिंडाने अखेरच्या षटकात ३० धावा दिल्या. (वृत्तसंस्था)
>काटेरी मुकुट दिंडाकडेच...
२००९ च्या ‘आयपीएल’च्या सत्रात बांगलादेशच्या मशरफी मोर्तझाने डावातील अखेरच्या षटकात २६ धावांची खैरात केली होती. मात्र, दिंडाने देखील या महागड्या षटकाची बरोबरी करताना २०११ साली आणि २०१३ साली एका षटकात २६ धावा दिल्या होत्या. यानंतर, दिंडाचा हा विक्रम डेव्हिड हसी आणि राहुल शुक्ला यांनी मागे टाकला. या दोन्ही गोलंदाजांनी अनुक्रमे २०१३ आणि २०१४ साली प्रत्येकी २७ धावा दिल्या होत्या; परंतु आता दिंडाने पुन्हा एकदा सुमार मारा करताना हा ‘काटेरी मुकुट’ स्वत:कडे ठेवला आहे.
आतापर्यंतचे महागडे ठरलेले अखेरचे षटक..
अशोक दिंडा (पुणे) - ३० धावा वि. मुंबई, २०१७
डेव्हिड हसी (पंजाब) - २७ धावा वि. मुंबई, २०१३.
राहुल शुक्ला (दिल्ली) - २७ धावा वि. बँगलोर, २०१४.
अशोक दिंडा (पुणे) - २६ धावा वि. बंगळुरू, २०१३.
अशोक दिंडा (दिल्ली) - २६ धावा वि. पुणे, २०११.
मशरफी मोर्तझा (कोलकाता) - २६ धावा वि. डेक्कन, २००९.