दिनकर, प्राजक्ताने जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 09:53 AM2021-12-13T09:53:10+5:302021-12-13T09:53:22+5:30

पुन्हा 'बॅक ऑन ट्रॅक' डिफेन्स गटात प्रल्हाद धनावत, योगित वाघ अव्वल

Dinkar Prajakta won the Aurangabad Grand Marathon organized by lokmat | दिनकर, प्राजक्ताने जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन

दिनकर, प्राजक्ताने जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन

Next

औरंगाबाद : कोरोना संकटानंतर औरंगाबादकरांनी रविवारी आम्ही पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक आल्याचे दाखवून दिले. अंगाला झोंबणाऱ्या गारव्यावर मात करणारा ढोल-ताशांचा उत्साही गजर, आकाशाला क्षणात विविधरंगांनी व्यापणारी आतशबाजी, सत्तरी पार केलेल्या आजोबांचा गगनाला गवसणी घालणारा आत्मविश्वास, तरुण, तरुणी, विद्यार्थी धावपटूंच्या उत्स्फूर्त सहभागाला औरंगाबादकर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून दिलेला अपूर्व नजराणा, त्याच तोलामोलाचे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेले जबरदस्त नियोजन, उमद्या व उत्साहवर्धक वातावरणात रविवारी विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेल्या लोकमत समूहातर्फे आयोजित खुल्या गटातील २१ कि.मी. औरंगाबाद महामॅरेथॉन स्पर्धा नाशिकचा दिनकर महाले आणि नागपूरची प्राजक्ता गोडबोले यांनी जिंकली.

पुरुष गटात दिनकर महाले याने हे अंतर १ तास ११ मि. ५४ सेकंदांत पूर्ण केले. महिला गटात  विजेतेपदाची दावेदार असलेल्या ज्योती गवते हिला पिछाडीवर टाकत नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने २१ कि.मी.चे अंतर १ तास १८ मि. २२ सेकंदांत पूर्ण करीत अव्वल स्थानावर कब्जा केला. डिफेन्स गटात प्रल्हाद धनावत याने पुरुष, तर महिला गटात योगिता वाघने बाजी मारली.

लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या संस्थापिका आशू दर्डा,  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आ. संजय शिरसाट, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक निमित गोयल, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापक संचालिका रुचिरा दर्डा, शीतल दर्डा, क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे, रेस डायरेक्टर संजय पाटील यांच्या उपस्थितीत औरंगाबादकरांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या लोकमत समूह आयोजित महामॅरेथॉन अमाप उत्साहात रविवारी पार पडली. गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिक, धावपटूच्या अंगात अपूर्व उत्साह संचारलेला होता. तुताऱ्या फुंकल्या जात होत्या. पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी २१ कि.मी.ची सुरुवात झाली. पोषक वातावरणामुळे सहभागी नागरिक, धावपटूंत एक नवचैतन्य संचारले होते. पुरुष गटातील खुल्या गटात नाशिकच्या दिनकर महाले व नंदुरबारच्या भगतसिंग यांच्यात चांगलीच चुरस होती. मात्र, चौथ्या पर्वातही बाजी मारणाऱ्या दिनकर महालेने आपला वेग वाढवत अव्वल स्थानावर कब्जा केला. दुसऱ्या स्थानी आलेल्या नंदुरबारच्या भगतसिंगने १ तास १३ मि. ७ सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबादचा रामेश्वर मुंजाळने १ तास १३ मि. ५० सेकंद वेळ नोंदवत कब्जा केला.

खुल्या गटात महिला गटातील २१ कि.मी. अर्धमॅरेथॉनमध्ये प्राजक्ता गोडबोलेने धक्कादायक निकालाची नोंद करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू परभणीच्या ज्योती गवतेला मागे टाकले. २१ कि.मी. रेस होण्याआधी लोणावळा येथे टाटा अल्ट्रा मॅरेथॉन ही ५० कि.मी. अंतराची रेस जिंकणाऱ्या ज्योती गवते हिच्या अनुभवामुळे  तिच्यावर थोडे दडपण होते.  रेसला सुरुवात झाल्यानंतर अनुभवी ज्योतीला मागे टाकत २०१९ साली इटलीतील नापोली येथे जागतिक विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने अव्वल स्थान पटकावले. ज्योती गवतेने १ तास २४ मि. ५९ सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. उस्मानाबादची योगिनी साळुंकेने १ तास ३० मि. ५० सेकंद वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले.

डिफेन्स गटात औरंगाबाद जिल्ह्यातील बेंदेवाडी येथील प्रल्हाद धनावत याने वर्चस्व राखले. जबलपूर येथे सैन्यदलात हवालदार असलेल्या आणि याआधी ४९ अर्धमॅरेथॉनमध्ये ठसा उमटवणाऱ्या प्रल्हाद धनावत  याने प्रथमच औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवताना १ तास ७ मि. ५० सेकंद वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. आता तो पुढील महिन्यात जानेवारीत बांगलादेश फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. दुसरे स्थान सुनील कुमारने, तर अम्बुज तिवारीने तिसरे स्थान पटकावले. महिला गटात योगिता सोनू वाघ अव्वल स्थान पटकावले. 

आता पुढची लोकमत महामॅरेथॉन पुण्याला
औरंगाबाद महामॅरेथॉनच्या उत्तुंग यशानंतर आता पुढील महामॅरेथॉन पुणे येथे ९ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर कोल्हापूरला २३ जानेवारी, नागपूरला १३ फेब्रुवारी आणि नाशिकला २७ फेब्रुवारी २०२२ रोजी रंगणार आहे.

Web Title: Dinkar Prajakta won the Aurangabad Grand Marathon organized by lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.