स्टार्कच्या पहिल्याच षटकाने दिशा निश्चित झाली
By admin | Published: March 29, 2015 11:54 PM2015-03-29T23:54:15+5:302015-03-29T23:54:15+5:30
मोक्याच्या क्षणी काही संघ, काही खेळाडू कामगिरीचा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरतात. काही संघ व खेळाडू मात्र त्यात अपयशी ठरतात
मोक्याच्या क्षणी काही संघ, काही खेळाडू कामगिरीचा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरतात. काही संघ व खेळाडू मात्र त्यात अपयशी ठरतात. चॅम्पियन्स व चॅलेंजर्स यांच्या दरम्यान हाच मुख्य फरक असतो. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड संघांदरम्यान रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान याची प्रचिती आली. आॅस्ट्रेलिया संघ या लढतीत शिकाऱ्याप्रमाणे भासला. मिशेल स्टार्कचे पहिले षटक सर्व काही स्पष्ट करणारे होते. वेग, स्विंग आणि नियंत्रण याचा अचूक मेळ साधत स्टार्कने ब्रेन्डन मॅक्युलमचा त्रिफळा उडवला. त्या वेळीच विश्वकप विजेता निश्चित झाला. त्याच वेळी सर्व काही घडले, असे सांगता येत नसले तरी त्याचा प्रभाव मात्र निश्चितच पडला. त्यानंतर न्यूझीलंडने संघर्ष केला, पण पॉवर प्लेमध्ये जेम्स फॉकनरच्या पहिल्याच षटकात विश्वविजेतेपद निश्चित झाले. मोक्याच्या क्षणी कामगिरीचा दर्जा उंचावणाऱ्या आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या यादीत फॉकनरने स्थान पक्के केले. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आॅस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी पसंती दर्शविण्यात येत होती आणि अंतिम सामना प्रारंभ होण्यापूर्वीही ती कायम होती. काही संघ अशी प्रतिमा जपण्यात यशस्वी ठरतात. न्यूझीलंड संघ अंडरडॉग्ज होता आणि अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे कामगिरीचा दर्जा उंचावण्यासोबत प्रतिस्पर्धी संघासोबत तुल्यबळ लढत देण्याचे आव्हान होते. मोक्याच्या क्षणी मात्र न्यूझीलंडला कामगिरीचा दर्जा उंचावण्यात अपयशी ठरला. गुप्तिल, अॅण्डरसन आणि रोंची यांच्या बाद होण्यामुळे ते स्पष्ट झाले. प्रत्युत्तरात खेळताना फिंचला लवकरच गमावल्यानंतर स्मिथ व वॉर्नर यांनी विश्वविजेत्याच्या थाटात खेळ केला. सर्वोत्तम संघाने विजय मिळविला. न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अंतिम फेरीपर्यंत आक्रमक क्रिकेट खेळले. पण, या विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम बाब म्हणजे दोन नवे चेंडू आणि मोठ्या बॅटदरम्यानच्या लढतीत मैदाने लहान असली, तरी गोलंदाजांनी फलंदाजांना पिछाडीवर सोडल्याचे निदर्शनास येते. जर तुमच्याकडे स्टार्क किंवा बोल्टप्रमाणे स्विंग, वहाब रियाज किंवा मोर्ने मोर्केलप्रमाणे वेग, इम्रान ताहिर किंवा डॅनियल व्हेटोरी किंवा रविचंद्रन अश्विन यांच्याप्रमाणे चेंडू वळवण्याची क्षमता असेल, तर निश्चितच फलंदाजांवर वर्चस्व गाजवता येते. भारतीय संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना खरंच चांगली कामगिरी केली आहे. अनेक खेळाडूंच्या वयाचा विचार करता या स्पर्धेमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. वन-डे क्रिकेटमध्ये गोलंदाज कामगिरीत सातत्य राखतील, अशी आशा आहे. गोलंदाजीमुळे उभय संघांतील फरक स्पष्ट होतो. विश्वकप स्पर्धेतून हा संदेश मिळाला असून, भारतासाठी हा महत्त्वाचा संदेश आहे. (टीसीएम)