आशियाई स्पर्धेसाठी निवड न होणे निराशाजनक; दीपा कर्माकरने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:20 AM2023-08-16T10:20:26+5:302023-08-16T10:21:53+5:30
नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडाच्या चाचणी स्पर्धेत दीपाने अव्वल स्थान पटकावले होते.
नवी दिल्ली : ‘आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड न होणे अनपेक्षित आहे. यावर भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आणि क्रीडा मंत्रालय या दोन्ही संस्थांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून हे अत्यंत निराशाजनक आणि आत्मविश्वास कमी करणारे आहे,’ असे भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने म्हटले. रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत दीपाने इतिहास रचला होता.
नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडाच्या चाचणी स्पर्धेत दीपाने अव्वल स्थान पटकावले होते. मात्र तरीही तिला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल आठ क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी न ठरल्याने दीपाची निवड होऊ शकली नाही. विशेष म्हणजे, दीपासाठी ही अट पूर्ण करणे शक्य नव्हते. कारण, डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्याने तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. दीपाचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी दोन दिवसांआधीच साइवर कठोर टीका केली होती. यानंतर आता दीपाने सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली.
दीपाने ‘एक्स’वर लिहिले की, ‘या स्वातंत्र्यदिनी मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार नुकत्याच घडलेल्या काही गोष्टींवर चर्चा करू इच्छिते जे खूप निराशाजनक आणि उत्साह कमी करणारे आहे. आशिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे मी गेल्या दोन वर्षांपासून खूप प्रतीक्षा करत होती. ही स्पर्धा आता माझ्यासाठी खूप दूर भासत आहे. माझ्यासाठी धक्कादायक बाब म्हणजे, चाचणीत अव्वल राहून आणि क्रीडा मंत्रालयाच्या निवड मर्यादांना पूर्ण केल्यानंतरही मी आशियाई स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे दिसत आहे.’ त्याचवेळी दीपाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्याला नक्की संघात स्थान मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.