सुमीत नागल याच्यावर शिस्तभंगाची कारवाई

By admin | Published: January 18, 2017 04:51 AM2017-01-18T04:51:13+5:302017-01-18T04:51:13+5:30

सुमित नागल याने स्पेनविरुद्ध डेव्हिस चषक पदार्पणाच्या लढतीत चमकदार कामगिरी केली होती

Disciplinary action against Sumit Nagal | सुमीत नागल याच्यावर शिस्तभंगाची कारवाई

सुमीत नागल याच्यावर शिस्तभंगाची कारवाई

Next


नवी दिल्ली : सुमित नागल याने स्पेनविरुद्ध डेव्हिस चषक पदार्पणाच्या लढतीत चमकदार कामगिरी केली होती, पण न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी या युवा खेळाडूला शिस्तभंगामुळे संघाबाहेर करण्यात आले. अ. भा. टेनिस महासंघाच्या (एआयटीए) सूत्रानी ही माहिती दिली.
कोरियाविरुद्ध गेल्या वर्षी जुलै महिन्यात खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान १९ वर्षीय नागल अती मद्यसेवनामुळे सकाळच्या सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. या लढतीत तो राखीव खेळाडू म्हणून संघात होता.
एआयटीएच्या सूत्राने सांगितले की, ‘आम्हाला माहिती मिळाली की, त्याने हॉटेलच्या आपल्या रुममधील मिनी बारमधील सर्व मद्य प्राशन केले होते. तुम्ही प्रतिभावान खेळाडू असून वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर सराव सत्राला दांडी मारता, हे स्वीकार्य नाही.’
दरम्यान, २०१५ मध्ये ज्युनिअर गटात विम्बल्डनचे जेतेपद पटकावित सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या नागलने स्पेनविरुद्धच्या लढतीदरम्यान परवानगीशिवाय आपल्या गर्ल फ्रेंडला आणले होते.
सूत्रानी दावा केला आहे की,‘त्याने आपल्या गर्ल फ्रेंडला दिल्लीला बोलविण्यापूर्वी कुणाला विचारले नव्हते. ज्यावेळी तो हॉटेलमध्ये दाखल झाला त्यावेळी त्याच्यासोबत एक मुलगी होती. कर्णधार आनंदने त्याला ताबडतोब गर्ल फ्रेंडला परत पाठविण्यास सांगितले. त्याने तसे केले.’
हे प्रकरण जुलैमध्ये घडले असताना नागलला आता शिक्षा का देण्यात आली. त्याला सप्टेंबर महिन्यात स्पेनविरुद्धच्या लढतीत पदार्पणाची संधी का देण्यात आली, असे विचारले असता सूत्राने सांगितले की, त्यावेळी काय घडले, याबाबत आम्हाला निश्चित माहिती नव्हती. ज्यावेळी त्याला विचारणा करण्यात आली त्यावेळी त्याने आरोपाचे खंडन केले. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, पण आता प्रकरण आणखी चिघळले आहे. अनेक नव्या बाबी समोर आल्यामुळे आम्ही कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.’
एआयटीएने ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित आशिया-ओसियाना ‘अ’ गटाच्या सामन्यासाठी पाच सदस्यांच्या संघाची निवड करण्यात आली. साधारणपणे संघात दोन राखीव खेळाडूंसह सहा खेळाडूंचा समावेश असतो.
स्पेनविरुद्धच्या लढतीत स्पर्धेची औपचारिकता पूर्ण करणारी पाचवी लढत श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे कारण देत नागलने खेळण्यास नकार दिला होता. त्याचा हा निर्णयही एआयटीएला रुचला नव्हता.
सूत्रानी सांगितले की,‘रिव्हर्स सिंगलमध्ये तो आपली लढत संपविण्यास तयार नव्हता. तो सातत्याने रिटायर्ड होण्याबाबत बोलत होता. कारण त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तो युवा खेळाडू असून खेळण्यास सक्षम नसेल तर त्याला संघात स्थान देण्यात अर्थ नाही.’
एआयटीएच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर घटनेबाबत सांगितले, पण नागलसाठी संघाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकारी म्हणाला,‘त्याच्यावर अस्थायी स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे. तो युवा असून त्याला संघात स्थान मिळवण्याची संधी आहे.’
नागलने याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. याबाबत निवड समितीचे अध्यक्ष एस.पी. मिश्रा म्हणाले,‘मी केवळ एवढेच सांगू शकतो की, नागल प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्यातील उत्साह आम्ही बघितला आहे. डेव्हिस कप स्पर्धेत त्याच्याकडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Disciplinary action against Sumit Nagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.