बीसीसीआयच्या दिग्गजांमध्ये चर्चा
By admin | Published: September 24, 2015 11:48 PM2015-09-24T23:48:07+5:302015-09-24T23:48:07+5:30
जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर पाच दिवसांनी बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांसाठी क्रिकेट बोर्डाच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याचे संकेत मिळत आहेत.
नवी दिल्ली : जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर पाच दिवसांनी बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांसाठी क्रिकेट बोर्डाच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याचे संकेत मिळत आहेत. विविध गटांदरम्यान चर्चा सुुरू असून, अध्यक्षपदासाठी ‘फिल्डिंग’ लावणे सुरू आहे.
माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन व शरद पवार यांची नागपुरात झालेली भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. उभय दिग्गजांदरम्यान दोन तास रंगलेल्या चर्चेनंतरही विशेष काही साध्य झाले नसल्याचे संकेत मिळत आहेत. या दोन्ही दिग्गजांकडे सध्या लढत देण्यासाठी पुरेसे बहुमत नाही, हे सत्य आहे.
श्रीनिवासन यांना बंगळुरुमध्ये अमिताभ चौधरी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. श्रीनिवासन यांनी आपली संघटनेवरील पकड जाणून घेण्यासाठी बंगळुरुमध्ये आपल्या विश्वासातील सदस्यांची बैठक बोलविली, पण पूर्व विभागातील संलग्न सहापैकी पाच संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत. केएससीएचे प्रतिनिधी ब्रजेश पटेल आणि केरळ क्रिकेट संघटनेचे टीसी मॅथ्यू येथे उपस्थित होते. या बैठकीमध्ये केवळ सहा संघटनांचे प्रतिनिधीच उपस्थित असल्याचे वृत्त आहे. पूर्व विभागातील संलग्न संस्थापैकी केवळ ओडिशा क्रिकेट संघटनेच्या प्रतिनिधीने या बैठकीत सहभाग नोंदवल्याचे वृत्त आहे, पण सचिव आशीर्वाद बेहडा यांनी बैठकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. बेहडा यांच्याकडे मतदानाचा अधिकार आहे. (वृत्तसंस्था)
नागपूर : आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्यासोबत बुधवारी रात्री भेट झाल्याचे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व मुंबई क्रिकेट संघटनेचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केले. श्रीनिवासन हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसले, तरी नव्या अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे पवार यांनी सांगितले. नागपूर श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे टिळक पत्रकार भवनमध्ये गुरुवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पवार बोलत होते.
जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चुरस असल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि शरद पवार या दोन विरोधी गटाच्या नेत्यांमध्ये नागपूरमध्ये बैठक झाल्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीला नवे वळण प्राप्त झाले आहे.
श्रीनिवासन यांच्यासोबतच्या बैठकीबाबत बोलताना पवार म्हणाले,‘‘हो, श्रीनिवासन बुधवारी रात्री मला भेटले. अॅड. शशांक मनोहर व मी कोलकाता येथे दालमिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असताना श्रीनिवासन यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली होती. काही अपरिहार्य कारणास्तव त्या वेळी भेट शक्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी फोन केला व भेटीची इच्छा व्यक्त केली. त्याला मी होकार दिला. या भेटीदरम्यान श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षाला सर्वांचा पाठिंबा असावा, अशी इच्छा व्यक्त केली.
नव्या अध्यक्षांची निवड करताना प्रत्येक सदस्याला विश्वासात घ्यायला हवे, असेही त्यांनी म्हटले.’’ पवार पुढे म्हणाले, ‘‘अॅड. शशांक मनोहर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आम्ही सर्वांनी एकत्र कार्य केले. पण, सध्या परिस्थिती वेगळी आहे. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी एकत्र कार्य करणे आवश्यक आहे. श्रीनिवासन यांच्यासोबतच्या बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी एका विशिष्ट नावावर चर्चा झाली नाही.’’ (क्रीडा प्रतिनिधी)