उत्तर प्रदेशात बसपाच्या ‘पुष्पा’ची चर्चा; ...आज तीच पुष्पा ‘फायर’ बनून भाजप विरोधात मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:18 PM2022-02-07T12:18:24+5:302022-02-07T12:24:26+5:30
पुष्पा शाही म्हणाल्या, “मायावती यांनी एका महिलेचे दु:ख समजून घेत उमेदवारी दिली. भाजपने मला तिकीट नाकारून अन्याय केला. या वेळी मी विजयी होणार आहे.”
देवरिया : ‘पुष्पा’ चित्रपटातील एक संवाद सध्या खूपच वापरला जात आहे. “पुष्पा जानकर फ्लावर समझा क्या मैं फायर है”. अशाच प्रकारे ज्या पुष्पाला फूल समजून भाजपने उमेदवारी नाकारली आज तीच पुष्पा ‘फायर’ बनून बहुजन समाज पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. देवरिया जिल्ह्यातील रामपूर कारखाना विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंड केलेल्या आणि बसपकडून उमेदवारी मिळवून पुष्पा शाही बड़हरा चौरस्त्यावर आल्या, तेव्हा बसपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
पुष्पा शाही म्हणाल्या, “मायावती यांनी एका महिलेचे दु:ख समजून घेत उमेदवारी दिली. भाजपने मला तिकीट नाकारून अन्याय केला. या वेळी मी विजयी होणार आहे.”
पुष्पा शाही यांचे पती गिरजेश ऊर्फ गुड्डू शाही रामपूर कारखाना विधानसभा मतदारसंघ २०१२ मध्ये अस्तित्वात आला तेव्हा अपक्ष लढून ४४ हजार ६८७ मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते. २०१७ मध्ये पुन्हा ते अपक्ष लढले व ४१ हज़ार ८१४ मते मिळवून तिसऱ्या स्थानी होते. २०१९ मध्ये गिरजेश शाही भाजपमध्ये आले.
गिरजेश शाही यांनी आपली पत्नी पुष्पा हिला उमेदवारी मागितली होती. परंतु, यादी जाहीर झाली तेव्हा सुरेंद्र चौरसिया यांचे नाव होते. नंतर गिरजेश शाही यांनी आपले गाव नौतनमध्ये पाठीराख्यांना एकत्र केले. बसपने त्या मतदारसंघात संदेश उर्फ मिस्टर यादव यांना तिकीट दिले होते. पुष्पा शाही यांनी पराभव न मानता मायावतींकडे तिकिटासाठी प्रयत्न सुरूच ठेवले.