मंत्रालयाच्या वादग्रस्त क्रीडासंहितेवर होणार चर्चा
By admin | Published: December 23, 2015 01:13 AM2015-12-23T01:13:14+5:302015-12-23T01:13:14+5:30
क्रीडा मंत्रालयाच्या वादग्रस्त क्रीडासंहितेच्या मुद्द्यावर काही राष्ट्रीय क्रीडा महासंघांची मान्यता रद्द करण्याची धमकी किती परिणामकारक ठरणार,
गुवाहाटी : क्रीडा मंत्रालयाच्या वादग्रस्त क्रीडासंहितेच्या मुद्द्यावर काही राष्ट्रीय क्रीडा महासंघांची मान्यता रद्द करण्याची धमकी किती परिणामकारक ठरणार, हे उद्या (बुधवारी) येथे होणाऱ्या भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या वार्षिक बैठकीत निश्चित होईल.
याशिवाय, गुवाहाटी आणि शिलाँग येथे १६ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या १६व्या द. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावादेखील याच बैठकीत घेण्यात येईल. पायाभूत सुविधांच्या उभारणीवर काही राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी आक्षेप नोंदविला आहे. स्पर्धेतील अधिकाधिक क्रीडाप्रकारांचे यजमानपद गुवाहाटीकडे असेल. वृत्तानुसार, आसामच्या राजधानीच्या शहरात हॉकी आणि नेमबाजी स्पर्धा आयोजित करणे कठीण आहे, कारण त्यासाठी पायाभूत सुविधांच्या नूतनीकरणासाठी कुठल्याची रकमेची तरतूद नाही.
एकूण २३ क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात येणार असून, शिलाँगला ७ क्रीडाप्रकार होतील. त्यांत बॅडमिंटनचादेखील समावेश होता; पण भारतीय बॅडमिंटन संघटनेने मेघालयाच्या राजधानीत सामने घेण्यास आक्षेप नोंदविल्यामुळे बॅडमिंटनचे आयोजन गुवाहाटीकडे सोपविण्यात आले.
याशिवाय, आमसभेत चर्चेला येणाऱ्या महत्त्वाच्या विषयात क्रीडा मंत्रालय आणि अ. भा. टेनिस संघ तसेच भारतीय ज्यूदो महासंघात सुरू असलेला तणावाचा समावेश राहील. क्रीडा मंत्रालयाने टेनिस आणि ज्यूदो महासंघाच्या अध्यक्षांना पदाचा राजीनामा देण्यास आंगितले आहे. या महासंघाचे अध्यक्ष नव्या क्रीडासंहितेनुसार ब्रेक न घेताच पदावर कायम आहेत. आम्ही क्रीडासंहिता मोडली नसल्याचा दावा दोन्ही महासंघांनी केला. यावर आमसभेत चर्चा होईल. (वृत्तसंस्था)