जलतरणपटूचा विनयभंग; प्रशिक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 03:43 AM2019-09-06T03:43:15+5:302019-09-06T03:43:27+5:30
गोव्यातील प्रकार : पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
पणजी : गोवा जलतरण संघटनेच्या प्रशिक्षकाला अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात निलंबित केले आहे. या घटनेची केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिज्जू यांनीही दखल घेतली असून गोवा पोलिसांनी या प्रशिक्षकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रशिक्षकाचे नाव सूरजीत गांगुली असे आहे. गोवा जलतरण संघटनेतर्फे त्याला कंत्राटी तत्त्वावर दोन वर्षांसाठी नियुक्त केले होते. म्हापसा (जि. उत्तर गोवा) येथे त्याचे कार्यक्षेत्र होते. प्रशिक्षणादरम्यान अल्पवयीन मुलीशी त्याने असभ्य वर्तन केले होते व तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात मुलीच्या पालकांकडून तक्रार केल्यानंतर संघटनेतर्फे ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी या प्रकरणी कठोर कारवाई केली जावी आणि या प्रशिक्षकाला देशात कोठेही कामाला घेतले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी, असा टष्ट्वीट केला आहे. हा प्रशिक्षक पश्चिम बंगालमधील असून पीडित युवतीही पश्चिम बंगालमधील आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी गोव्यातील जलतरणपटूंच्या चांगल्या कामगिरीबद्दल जलतरणपटूंसह या प्रशिक्षकाचेही गोवा विधानसभेत कौतुक केले गेले होते.
गोव्यातील म्हापसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कपिल नायक म्हणाले, ‘गांगुली भोपाळकडे रवाना झाल्याची शंका असल्याने पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी भोपाळकडे रवाना झाले. गांगुलीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (विनयभंग) आणि ५०६ (धमकावणे) यासह लैंगिक अपराधातून मुलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोक्सो कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.’ जीएसए सचिव सय्यद माजिद यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ तपासल्यानंतर सुरजितचा करार तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे.