दिव्यांग आर्चर : उपेक्षा आणि अडचणींवर मात करीत गाजविले मैदान, त्यांच्या जिद्दीला सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:12 AM2017-08-29T00:12:42+5:302017-08-29T00:24:41+5:30
संदीप गवई आणि अभिषेक ठवरे. धनुर्विद्येत पारंगत असलेले हे दिव्यांग खेळाडू देशाची मान उंचावत आहेत. दोघांनाही आर्थिक पाठबळ नसले तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठण्याची जिद्द मात्र काायम आहे.
- किशोर बागडे
नागपूर: संदीप गवई आणि अभिषेक ठवरे. धनुर्विद्येत पारंगत असलेले हे दिव्यांग खेळाडू देशाची मान उंचावत आहेत. दोघांनाही आर्थिक पाठबळ नसले तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठण्याची जिद्द मात्र काायम आहे.
मैदानावर भरारी घेण्यासाठी दोघांनीही सर्वस्व पणाला लावले आहे. क्रीडा संस्कृती रुजविण्याचे, खेळाचे हित साधण्याचे गाजर दाखविले जात असले तरी खेळाडूंचे कल्याण होईल, असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. दुर्लक्षित असले तरी खेळातून स्वत:ची ओळख निर्माण करण्याच्या ध्यासाने झपाटलेल्या या
खेळाडूंकडे शासन व समाजाचे लक्ष का जात नाही, हाच खरा प्रश्न आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंच्या किमान अपेक्षा, वास्तव आणि गरजा समजून घेणे गरजेचे आहे.
अभिषेक, भारताचा पहिला टीथ आर्चर आईचे दागिने गहाण ठेवून जुना आर्चरी सेट विकत घेणारा अभिकेष जन्मापासून पोलिओग्रस्त. जिद्द त्याच्या
रक्तात भिनलेली. आई खासगी दवाखान्यात स्वयंपाकीण तर वडील ट्रान्सपोर्टमध्ये खासगी कर्मचारी. राहायला छोटखानी घर. सुरुवातीला अभिषेक अॅथ्लेटिक्समध्ये गेला. तेथे मैदान गाजविल्यानंतर २०१४ पासून आर्चरीकडे वळला. महागडे साहित्य खरेदीसाठी पैसे नव्हते. आईने मुलाची तळमळ ओळखली. अभिषेकने आईच्या मंगळसूत्र गहाणातून आलेल्या पैशाने आर्चरीच्या साहित्याची खरेदी केल्यानंतर अनेक स्पर्धा गाजविल्या. तो दाताने धनुर्विधा करणारा देशातील पहिला आर्चर ठरला. टीव्हीवरील अनेक रिअॅलिटी शोमधून झळकत असल्याने देशभर ओळख झाली.
अमेरिकेच्या मूळनिवासी संस्थेने तिथल्या टीव्हीसाठी त्याचा कारनामा रेकॉर्ड केला. अभिषेकने स्पर्धात्मक पातळीवर आंतर विद्यापीठ स्तरावरदेखील पदक जिंकले आहे.
सध्या तो रोहतकच्या साई केंद्रात भारतीय संघाच्या शिबिरात व्यस्त आहे. याच खेळात चार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारा एका पायाने दिव्यांग संदीप गवई हा देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत २००९ पासून घाम गाळत आहे. तो देखील साई केंद्रात भारतीय संघ निवड
चाचणीसाठी गेला आहे. खेळासाठी पैशाची तजवीज करण्यासाठी संदीप कार्यक्रमात फेटे बांधतो. त्यातून आलेली बिदागी तो खेळासाठी वापरतो. थायलंडच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने कांस्य पदक जिंकले.
संदीपच्या आंतरराष्ट्रीय कर्तृवाचा गौरव म्हणून राज्य शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला. आर्चरीसारख्या महागड्या खेळात वर्षाला किमान १२ बो लागतात. एक डझन बो साठी ३६ हजार मोजावे लागतात. घरच्यांचा सांभाळ करून इतकी रक्कम खेळावर खर्च करण्याची ताकद नसली तरी
हे दोन्ही अपंग खेळाडू जीवापाड मेहनत करीत खेळासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. अभिषेकच्या मदतीला दुसरा शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू विपिन इटनकर धावला. त्याने ५० हजार रुपये दिल्यामुळे अभिषेक आज भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी होऊ शकला.
दोघांनाही अपंग कोट्यात नोकरी मिळविण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
किमान सरावाचा खर्च मिळावा...
दोघांचीही माफक अपेक्षा आहे, ती म्हणजे किमान सरावावर होणारा खर्च सरकारने द्यावा. हरियाणा सरकार आपल्या खेळाडूंना नोकरी तर देतेच पण सरावासाठी दरवर्षी किमान दोन लाख रुपयाची मदत करते. महाराष्टÑात असे काही प्रोत्साहन मिळत नाही. आॅलिम्पिक खेळ असलेल्या
आर्चरीत देशाला पदके मिळण्याची शक्यता असूनही राज्य सरकार आमच्यासारख्या दिव्यांग खेळाडूंना कुठलेही आर्थिक
पाठबळ देत नाही. कुठलेही प्रायोजक नसताना आम्ही आंतरराष्ट्रीय पातळी गाठली तरीही उपेक्षा कायम आहे.
राज्याबाहेर आमचे फार कौतुक होते पण आपल्याच राज्यात सराव आणि स्पर्धेसाठी कुठेलेही आर्थिक पाठबळ मिळत नाही, असे अभिषेक म्हणाला. राज्यकर्त्यांकडूनही कमालीची उदासिनता बाळगली जात असल्याबद्दल या दोन्ही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.