पोर्तुगालमध्ये दिवाळी
By admin | Published: July 12, 2016 03:30 AM2016-07-12T03:30:50+5:302016-07-12T03:30:50+5:30
ऐतिहासिक विजेतेपद जिंकणारा पोर्तुगाल फुटबॉल संघाचे लेझबन विमानतळ व शहरामध्ये रंगारंग व जल्लोषात स्वागत करण्यात आले
पॅरिस : ऐतिहासिक विजेतेपद जिंकणारा पोर्तुगाल फुटबॉल संघाचे लेझबन विमानतळ व शहरामध्ये रंगारंग व जल्लोषात स्वागत करण्यात आले. विजयी निकाल लागल्यानंतर पोर्तुगाल देशात रात्रभर फुटबॉल प्रेमींनी दिवाळी साजरी केली.
लिस्बन येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेव्हा विजेत्या संघाचे विमान उतरले तेव्हा धावपट्टीच्या दोन्ही बाजूंकडून लाल व हिरव्या रंगाची उधळण करण्यात आली. फुटबॉलप्रेमींनी जबरदस्त उत्साह दाखवत राष्ट्रध्वजाचा वेश परिधान करून विमानतळाच्या इमारतीसमोर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
१९२१ पासून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये खेळत असलेल्या पोर्तुगालचे हे पहिलेच मुख्य विजेतेपद ठरले. विमानतळावरून पोर्तुगीज टीम बेलेम पॅलेस येथे रवाना झाली. तेथे पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौउसा यांच्या हस्ते संघाला गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, या वेळी राष्ट्रपतींनी पोर्तुगीज टीमला पोर्तुगालचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘कमांडर’ने सन्मानित केले.
या दिमाखदार सोहळ्यानंतर पोर्तुगाल चॅम्पियन संघाचा युरो कप विजयाचा जल्लोष सर्वसामान्य नागरिकांसह साजरा करण्यासाठी लिस्बन येथील मुख्य ठिकाणी बसमधून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू एडरने १०९व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर पोर्तुगालने यजमान फ्रान्सला १-० असा धक्का देऊन पहिल्यांदाच युरो चषकावर नाव कोरले. यानंतर रात्रभर पोर्तुगालच्या रस्त्यांवर विजेतेपदाचा जल्लोष देशवासीयांकडून केला गेला.
एडरच्या गोलनंतर सेंट डेनिस स्टेडियममधील उपस्थित पोर्तुगालच्या हजारो पाठीराख्यांनी जबरदस्त जल्लोष केला. तर दुसरीकडे, यजमान फ्रान्सच्या पाठीराख्यांचा आपल्या संघाच्या घरच्या मैदानावर झालेल्या पराभवावर विश्वास बसत नव्हता.
दरम्यान, सामन्यातील स्थितीचा विचार केल्यास फ्रान्सने या वेळी जबरदस्त वर्चस्व राखले होते. त्यांनी तब्बल ७ वेळा गोलजाळ्याचा वेध घेऊन पोर्तुगालला दबावाखाली ठेवले. तर, पोर्तुगालने केवळ ३ वेळा गोलजाळ्याचा वेध घेतला होता. त्याच वेळी फ्रान्सने कॉर्नरकिकमध्येही वर्चस्व राखताना ९ कॉर्नरकिक मिळविल्या होत्या, तर पोर्तुगालने ५ कॉर्नरकिक मिळवल्या. चेंडूवरील नियंत्रणाच्या बाबतीतही फ्रान्सने बाजी मारताना सामन्याच्या एकूण वेळेच्या तुलनेत ५३ टक्के वेळ चेंडू अपल्या ताब्यात ठेवला. तसेच, यजमानांनी एकूण ६४४ पास पूर्ण केले, तर पोर्तुगालने ४९६ पास पूर्ण केले. याच वेळी धुसमुसळ्या खेळाबाबतीत मात्र पोर्तुगाल पुढे राहिला. पोर्तुगालला एकूण ६ यलो कार्डना सामोरे जावे लागले, तर यजमान फ्रान्सला ४ यलो कार्ड स्वीकारावी लागली. (वृत्तसंस्था)
पोर्तुगाल आणि यजमान फ्रान्स यांच्यादरम्यान रोमहर्षक विजेतेपदाच्या लढतीत फ्रान्स एका गोलने पराभूत झाल्यानंतर राजधानीत झालेल्या धुडगुसामध्ये पोलिसांनी ४० लोकांना अटक केली.
रविवारी झालेल्या या लढतीदरम्यान प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या फॅन झोनमध्ये ९० हजारांपेक्षा जास्त संख्येने चाहते स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर या लढतीत फ्रान्स पराभूत झाल्यानंतर चाहत्यांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली.
तिसऱ्यांदा युरो चॅम्पियन ठरण्याचे स्वप्न भंग झाल्यानंतर फ्रान्स संघाच्या चाहत्यांनी पॅरिसच्या आयफेल टॉवरजवळ तसेच अन्य प्रमुख स्थानांवर जमाव करून धुडगूस घातला. या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
सामना पाहिल्यानंतर परतणाऱ्या दहा हजार लोकांनी आपला राग सरकारी वस्तूंवर काढत त्यांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा करीत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला.
ज्या प्रकारे मी अपेक्षा केली होती, तशी ही फायनल नव्हती. मात्र, देश विजयी झाल्याने मी आनंदी असून मला या विजयाचा गर्व वाटतो. हे विजेतेपद संपूर्ण पोर्तुगालसह आमच्या टीमला पाठिंबा दिलेल्या प्रत्येक चाहत्याला समर्पित आहे. दुखापतीनंतर मी सामन्यात पुनरागमनाचे प्रयत्न केले; परंतु माझा गुडघा सुजल्याने प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे मैदानावर परतणे माझ्यासाठी अशक्य होते.
- ख्रिस्तियानो रोनाल्डो, पोर्तुगाल
रोनाल्डोकडून पुन्हा पराभूत होणे दु:खद : ग्रिझमन
सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानोचा संघ पोर्तुगालकडून युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर फ्रान्सचा अँटोनियो ग्रिझमन याने रोनाल्डोकडून पराभूत झाल्याने खूप दु:ख झाल्याचे म्हटले आहे.
फ्रान्स पाठीराख्यांचा रोष
युरो चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालविरुद्ध झालेला अनपेक्षित पराभवानंतर फ्रान्सच्या पाठीराख्यांनी मजबूत दंगा करताना जगप्रसिध्द आयफेल टॉवर परिसरात व अन्य ठिकाणी बाटल्या फेकण्यास सुरुवात केली.
यानंतर पोलिसांनी अश्रुधुरांचे
गोळे सोडून दंगल रोखण्याचा प्रयत्न केला. सुमारे ९० हजार क्षमतेचे सेंट डेनिस स्टेडियम खचाखच भरल्यानंतर या फुटबॉलप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला नव्हता.
या वेळी पोलिसांनी स्टेडियमच्या बाहेरील परिसरातूनही काही चाहत्यांना अटक केली.
आम्ही विजयी होणारच या विश्वासाने फ्रान्स संघाच्या व्यवस्थापनाने विजय साजरा करण्यासाठी खास तयारी केली होती. जल्लोषात विजय मिरवणूक काढण्यासाठी खास बससुद्धा तयार केली होती. पण पोर्तुगालच्या एडरने गोल करून त्यावर पाणी फेरले.
च्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत आपण नक्कीच पोर्तुगालचा पराभव करू सा विश्वास फ्रान्सच्या खेळाडूंना होता. फ्रान्स संघाने सुरुवातीपासूनच तसा खेळ करून वर्चस्व ठेवले होते. अतिरिक्त वेळेत १०९व्या मिनिटाला पोर्तुगालच्या एडरने मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेत संघाचा विजयी गोल नोंदवून फ्रान्सच्या आनंदावर विरजण घातले.
दोन दिग्गजांना अनावर झाले अश्रू
ख्रिस्तियानो रोनाल्डो व लियोनेल मेस्सी या दोन दिग्गज कर्णधारांना दोन वेगवेगळ्या महत्त्वाच्या स्पर्धांच्या अंतिम लढतीत अश्रू अनावर झाले होते.
या दोन महान फुटबॉपटूंच्या अश्रूंची कारणे मात्र वेगवेगळी आहेत. पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो सामन्याच्या २५व्या मिनिटाला दुखापतग्रस्त झाला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. पण, नंतर त्याच्या अश्रूंचे रूपांतर आनंदाश्रूंमध्ये झाले. रोनाल्डोच्या संघाने बलाढ्य फ्रान्सचा पराभव करून युरो चषक जिंकला.
दुसरीकडे, लियोनेल मेस्सी या अर्जेंटिनाच्या कर्णधारालासुद्धा कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान आपले अश्रू थांबविता आले नाहीत. अर्जेंटिना संघाला चिलीकडून पराभव पत्करावा लागला होता आणि मेस्सीच्या अश्रूंचे रूपांतर शेवटी त्याच्या निवृत्तीत झाले.
देशवासीयांना केले विजेतेपद समर्पित
पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो चषकाचे ऐतिहासिक विजेतेपद आपल्या देशवासीयांना समर्पित केले.
महिनाभरातच मी दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने खूप दु:खी आहे. आम्ही विजयाच्या खूप जवळ होतो; मात्र पोर्तुगालने आम्हाला अधिक संधी दिल्या नाहीत. त्यांनी खूप चांगला खेळ केला. मला माझ्या संघ सहकाऱ्यांचा गर्व असून आम्ही जे काही मिळवलंय ते खूप किमती आहे. आज आमचा दिवस नव्हता हे, मात्र नक्की.
- अँटोनिओ ग्रीझमन, फ्रान्स