जोकोविचच्या ऐतिहासिक स्वप्नांना तडा; अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवकडून पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:11 AM2021-09-14T11:11:22+5:302021-09-14T11:12:25+5:30
कॅलेंडर स्लॅमसह २१ व्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न भंगले
न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन जिंकत कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याच्या नोवाक जोकोविचच्या स्वप्नांना अंतिम फेरीत तडा गेला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जोकोविचला ६-४, ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत आयुष्यातील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली.
एकतर्फी झालेल्या या सामन्यात मेदवेदेवने झंझावाती खेळ करत जोकोविचच्या ऐतिहासिक विक्रमी जेतेपद पटकावण्याच्या अपेक्षांचा चुराडा केला. मात्र, या पराभवानंतरही जोकोविचने एक विक्रम आपल्या नावे केला. ३४ वर्षीय जोकोविच करिअरमध्ये ३१व्या वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा खेळाडू ठरला आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे.
१९६९ नंतर कॅलेंडर ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू होण्यासाठी जोकोविचला फक्त एका विजयाची गरज होती. रॉड लिव्हर यांनी ५२ वर्षांपूर्वी एकाच वर्षात चार ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला होता, तर महिलामध्ये स्टेफी ग्राफने १९८८ मध्ये कॅलेंडर स्लॅम जिकंण्याचा मान मिळवला होता. या दिग्गजांच्या मांदियाळीत बसण्यासाठी जोकोविचसुद्धा तितकाच उत्सुक होता. त्याच दृष्टीने पाऊले टाकत जोकोविचने यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते, तसेच वर्षभरातील ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग २७ सामने जिंकत तो अंतिम फेरीत दाखल झाला होता.
“हा सामना जिंकण्याचा जर कोणाला खरच हक्क असेल तर तो मेदवेदेवला आहे. काय शानदार खेळला हा आज! भविष्यातही असे विजयी क्षण तुझ्या वाट्याला येणार आहेत याची मला खात्री आहे. आज मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो आहे. कारण तुम्ही लोकांनी ज्याप्रकारे मला पाठिंबा दिला. मी खूप खास खेळाडू असल्याचा मला भास करून दिला. विशेष म्हणजे न्यूयॉर्कमध्ये खेळत असताना मला असे कधीच वाटले नव्हते. या पाठिंब्यासाठी तुमचे मनापासून आभार. माझं तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे.” – जोकोविच
“सर्वप्रथम मी जोकोविचची आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. कारण हा अनुभव कोणत्याही खेळाडूसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी खूप कठीण असतो. जोकोविचने यावर्षी आणि आपल्या संपूर्ण कारकिर्दीत भरपूर यश मिळवले. त्यामुळे मी हे यापूर्वी हे कधी कोणासाठी म्हटलेले नाही, पण आज म्हणतोय की, माझ्यासाठी जोकोविच हा टेनिस इतिहासातील सर्वात महान खेळाडू आहे.” - मेदवेदेव