जोकोविच, फेडरर विजेतेपदाच्या शर्यतीत
By Admin | Published: January 19, 2015 03:12 AM2015-01-19T03:12:42+5:302015-01-19T03:12:42+5:30
नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर येथे उद्यापासून सुरू होणा-या वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत आपल्या पाचव्या आॅस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाच्या शर्यतीत असतील,
मेलबर्न : नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर येथे उद्यापासून सुरू होणा-या वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत आपल्या पाचव्या आॅस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाच्या शर्यतीत असतील, तर महिला गटात सेरेना विल्यम्सचेही तिच्या कारकिर्दीतील १९ वे मोठे अजिंक्यपद मिळवण्याचे लक्ष्य असेल.
जागतिक क्रमवारीतील नंबर वन सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने गत सात आॅस्ट्रेलियन ओपनमधील चारदा विजेतेपद मिळविले आहे आणि मेलबर्नवरील हाडकोर्टवर तो सर्वांत तुल्यबळ खेळाडू मानला जातो, तर दुसरीकडे स्वित्झर्लंडचा ३३ वर्षीय फेडररही आपले पाचवे आॅस्ट्रेलियन विजेतेपद आणि कारकिर्दीतील १८ वे ग्रँडस्लॅमचे अजिंक्यपद जिंकण्यासाठी खेळेल.
त्याचबरोबर फेडरर दोन वर्षांपासून असलेल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास आतुर असेल. त्याने याआधी २0१२ मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. राफेल नदालच्या मॅच फिटनेसवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मनगटाची दुखापत आणि पोटाशी संबंधित तक्रारीनंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यात विम्बल्डननंतर तो मोजक्या सामन्यात खेळताना दिसला. त्याला कतार ओपनदरम्यान दोहा येथे पहिल्याच सामन्यात जर्मनीच्या क्वॉलिफायर मायकल बरेराकडून सनसनाटी पराभव पत्करावा लागला होता. नदालने आतापर्यंत मेलबर्न पार्कवर एकदाच विजेतेपदाची चव चाखली आहे, तर दोन वेळेस त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यात गेल्या वेळेसच्या स्पर्धेचा समावेश आहे. तेव्हा त्याला स्टेनिसलास वावरिंकाकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
इंग्लंडचा अँडी मरे याने तीन वेळेस आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली आहे आणि चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्याला फेडरर आणि नदालचे आव्हान यशस्वीपणे पेलावे लागेल. विद्यमान चॅम्पियन स्वित्झर्लंडचा वावरिंका याने या हंगामात चेन्नई ओपनचे विजेतेपद जिंकले आहे आणि त्याला चांगलीच लय सापडली आहे. दुसरीकडे महिला गटात जागतिक क्रमवारीतील नंबर वन आणि पाच वेळेसची विजेती सेरेना विल्यम्स यंदा विजेतेपद जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावून खेळेल. तिने २0१0 मध्ये अखेरच्या वेळेस या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. गतविजेती चीनची ली ना हिने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या स्पर्धेत ती दिसणार नाही. महिलांतील चार अव्वल खेळाडूंत सेरेना, मारिया शारापोव्हा, सिमोन हेलेप आणि पेट्रा क्विटोव्हा यांच्यात मुख्य झुंज असेल आणि त्यांच्या जवळ स्पर्धा जिंकण्याबरोबरच जागतिक क्रमवारीत नंबर वन बनण्याची संधी असेल.(वृत्तसंस्था)