जोकोविच चौथ्या फेरीत
By Admin | Published: July 9, 2017 02:54 AM2017-07-09T02:54:59+5:302017-07-09T02:54:59+5:30
द्वितीय मानांकीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने विजयी घोडदौड कायम राखताना विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत धडक मारली. लात्वियाच्या एरनेस्ट्स गुल्बिस याला
लंडन : द्वितीय मानांकीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने विजयी घोडदौड कायम राखताना विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत धडक मारली. लात्वियाच्या एरनेस्ट्स गुल्बिस याला सरळ तीन सेटमध्ये नमवताना जोकोने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. २ तास १३ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-४, ६-१, ७-६ (७-२) असा दमदार विजय मिळवत जोकोने गुल्बिसला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. पहिले दोन सेट सहज गमावल्यानंतर गुल्बिसने तिसरा सेट टायब्रेकपर्यंत नेताना चांगली झुंज दिली. परंतु, कसलेल्या जोकोच्या धडाक्यापुढे गुल्बिसचा निभाव लागला नाही.
महिला गटातील अव्वल खेळाडू अँजेलिक केर्बर हिने आपली विजयी घोडदौड कायम राखताना चौथ्या फेरीत धडक मारली. मात्र, यासाठी तिला अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सविरुद्ध तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. तसेच, गर्बाइन मुगुरुझा, स्वेतलाना कुझ्नेत्सोवा यांनी सहज आगेकूच केली. पुरुषांमध्ये मिलोस राओनिक, ग्रिगोव दिमित्रोव यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला.
रॉजर्सने अव्वल खेळाडू केर्बरला झुंजवताना सर्वांचे लक्ष वेधले. तीन सेटपर्यंत खेळल्या गेलेल्या या सामन्यात केर्बरने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारली. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर केर्बरने झुंजार खेळाचे प्रदर्शन करून रॉजर्सचे कडवे आव्हान ४-६, ७-६ (७-२), ६-४ असे परतावले. दुसरीकडे, मुगुरुझाने धमाकेदार विजयासह चौथी फेरी गाठताना रोमानियाच्या सोरोना किरस्टी हिचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. अकराव्या मानांकित पोलंडच्या एग्निएस्झका रांदवास्का हिने अटीतटीच्या लढतीत स्वित्झर्लंडच्या टायमा बाक्सिनझ्की हिचे आव्हान ३-६, ६-४, ६-१ असे परतावले.
अनुभवी कुझ्नेत्सोवाने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना स्लोवेनियाच्या पोलोना हरकॉग हिचा ६-४, ६-० असा फडशा पाडला. पुरुषांमध्ये सहाव्या मानांकित राओनिकने स्पेनच्या अल्बर्ट रामोस-विनोलासचा तीन सेटमध्ये ७-६ (७-३), ६-४, ७-५ असा पाडाव केला. त्याचवेळी फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रेड त्सोंगाला अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागल्याने यंदाच्या विम्बल्डनमधून आपला गाशा गुंडाळावा लागला. पाच सेटपर्यंतच्या रोमांचक सामन्यात त्सोंगाला अमेरिकेच्या सॅम क्वेरीविरुद्ध २-६, ६-३, ६-७ (५-७), ६-१, ५-७ असा पराभव पत्करावा लागला. इस्त्रायलच्या दुदी सेला याने कसलेल्या दिमित्रोवविरुद्ध दोन सेट गमावल्यानंतर माघार घेतली. सेलाने माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा दिमित्रोव ६-१, ६-१ असा आघाडीवर होता.(वृत्तसंस्था)
भारतीय खेळाडूंची आगेकूच...
दुहेरीमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरीसह आगेकूच केली. मिश्र दुहेरीत भारताच्या अनुभवी रोहन बोपन्नाने कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोवस्कीसह तिसरी फेरी गाठली. रोहन - गॅब्रिएला यांनी सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना रालुचा ओलारु (रोमानिया) - फॅब्रिक मार्टिन (फ्रान्स) यांचा ७-६ (७-२), ७-५ असा पराभव केला. त्याचवेळी, महिला दुहेरीत भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा - क्रिस्टिन फ्लिपकेन्स (बेल्जियम) या जोडीने तिसरी फेरी गाठताना नाओमी ब्रोडी - हीथर वॉटसन या इंग्लंडच्या जोडीचा ६-३, ३-६, ६-४ असा पाडाव केला.