जोकोविचला सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी

By admin | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:41+5:302016-04-03T03:52:41+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनला पराभूत करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Djokovic has the chance to become the sixth champion | जोकोविचला सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी

जोकोविचला सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी

Next

मियामी : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनला पराभूत करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता सहाव्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या जोकोविचची गाठ पडणार आहे ती जपानच्या केई निशिकोरी याच्याशी.
अव्वल मानांकित जोकोविचने उपांत्य फेरीत गोफिनचे आव्हान ७-६, ६-४ असे मोडित काढले. आता त्याच्या समोर अंतिम फेरीत निशिकोरी याचे आव्हान असणार आहे. निशिकोरीने २४ व्या मानांकित आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गियोस याला ८४ मिनिटांत ६-३, ७-५ अशा सलग सेटस्मध्ये पराभूत करताना फायनलमध्ये प्रवेश मिळवला.नंबर वन खेळाडू जोकोविचला उपांत्य फेरीत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला सामना जिंकण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. त्याचबरोबर आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन असणाऱ्या जोकोविचने या वर्षीचे आपले रेकॉर्ड २७-१ असे केले. २८ वर्षीय जोकोविच जर सहाव्यांद विजेतेपद पटकाविण्यात यशस्वी ठरल्यास तो अमेरिकेच्या आंद्रे अगासीच्या सहा वेळेस अजिंक्य ठरल्याच्या विक्रमाची बरोबरी साधणार आहे आणि त्यामुळे त्याला २८ वा एटीपी वर्ल्ड टूर मास्टर्स १,००० किताबदेखील मिळेल. उष्ण वातावरणात व प्रतिकूल परिस्थितीत जिंकणे विशेष आणि याचा मला अभिमान वाटतो, असे विजयानंतर जोकोविचने सांगितले. जोकोविच या वर्षी आतापर्यंत फेब्रुवारीत केवळ एकदाच पराभूत झाला आहे. त्याने दुबई ओपनमध्ये स्पेनच्या फेलिसियानो लोपेजविरुद्धच्या सामन्यातून डोळ्याच्या समस्येमुळे माघार घेतली होती. सर्बियन खेळाडू जोकोविचने गोफिनची प्रशंसा करताना म्हटले की, ‘त्याने आपली सर्व्हिस सुधारली आहे आणि त्याला समजण्यात मला कठीण गेले. त्याच्याविरुद्धचा सामना खडतर होता.’
जोकोविच या स्पर्धेत २००७, २०११, २०१२, २०१४ आणि २०१५ मध्ये चॅम्पियन ठरला आहे. या सामन्यात पराभूत झालेल्या २५ वर्षीय गोफिनला रँकिंगमध्ये मात्र फायदा झाला असून, तो १३ व्या रँकिंगवर पोहोचला असून, हे त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत निशिकोरीने २४ व्या मानांकित किर्गियोस याचा ८४ मिनिटांत ६-३, ७-५ असा सलग सेटस्मध्ये पराभव करताना अंतिम फेरी गाठली. या लढतीदरम्यान जपानी खेळाडूने आक्रमक खेळ केला. त्याचे उत्तर आॅस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यांजवळ नव्हते.
विजयानंतर निशिकोरीने म्हटले की, ‘मी शानदार लयीत होतो. माझ्या सर्व्हिसमध्ये वेग होता आणि चेंडूवर ताकदीने प्रहार करण्यातही यशस्वी ठरलो. मी या लढतीत विशेष योजनेसह उतरलो होतो आणि त्यात यशस्वी ठरल्याचा मला आनंद वाटतोय. किर्गियोसनेदेखील शानदार खेळ केला; परंतु अखेर मी त्याच्या खेळावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरलो. फायनलपर्यंत धडक मारणे एक रोमांचक अनुभव आहे.’
जोकोविचविरुद्धच्या लढतीविषयी तो म्हणाला की, ‘माझ्याजवळ गमावण्यासारखे काहीही नाही. मी लढतीच्या निकालाविषयी विचार करीत नाही. माझे लक्ष्य फक्त आपली चांगली कामगिरी करण्यावर आहे.’(वृत्तसंस्था)

Web Title: Djokovic has the chance to become the sixth champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.