जोकोविच, नदाल उपउपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: September 4, 2016 01:49 AM2016-09-04T01:49:56+5:302016-09-04T01:49:56+5:30
रशियाच्या मिखाईल युज्नीने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यामुळे नोव्हाक जोकोविचचा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोनदा जेतेपद
न्यूयॉर्क : रशियाच्या मिखाईल युज्नीने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यामुळे नोव्हाक जोकोविचचा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोनदा जेतेपद पटकाविणाऱ्या राफेल नदालने तीन वर्षांत प्रथमच अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले.
गत चॅम्पियन जोकोविच पहिल्या सेटमध्ये ४-२ ने आघाडीवर असताना रशियाच्या ३४ वर्षीय युज्नीने पायांचे स्नायू दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोविचसाठी पहिला आठवडा संघर्षपूर्ण ठरला. सोमवारी पहिल्या फेरीच्या लढतीत जॉर्जी यानोव्हिचचा पराभव करण्यासाठी जोकोविचला चार सेटपर्यंत घाम गाळावा लागला. चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लीने हाताच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे जोकोविचला दुसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाली. अव्वल मानांकित जोकोविचला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत ८४ व्या स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या केली एडमंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. एडमंडने अमेरिकेच्या जॉन इस्नरचा ६-४, ३-६, ६-२, ७-६ ने पराभव करीत ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत प्रथमच अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. नदालने रशियाच्या आंद्रेई कुज्नेत्सोव्हचा ६-१, ६-४, ६-२ ने पराभव करीत २०१३ नंतर प्रथमच प्री क्वॉर्टरमध्ये स्थान मिळवले.
महिला एकेरीत आठव्या मानांकित मेडिसन किजने तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये १-५ ने पिछाडीनंतर पुनरागमन करीत जपानच्या नाओमी ओसाकाचा ७-५, ४-६, ७-६ ने पराभव केला. २६ वे मानांकन प्राप्त अमेरिकेच्या जॅक सॉकने २०१४ मध्ये चॅम्पियन असलेल्या मारिन सिलिचचा ६-४, ६-३, ६-३ ने पराभव करीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. आगामी फेरीत नवव्या मानांकित फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्सोंगाने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अॅन्डरसनचा ६-३, ६-४, ७-६ ने पराभव केला. कॅरोलिन व्होज्नियाकीने रोमानियाच्या मोनिका निकोलेस्क्यूचा ६-३, ६-१ ने पराभव करीत तिच्याविरुद्ध सातवा विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)
मिश्र दुहेरीत सानियाची सरशी
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाचे वृत्त म्हणजे, २०१४ ची चॅम्पियन सानिया व डोडिग जोडीने डोनाल्ड यंग व टेलर टाऊनसेंड जोडीचा केवळ ६२ मिनिटांमध्ये ६-४, ६-४ ने पराभवासह पुढची फेरी गाठली.
मिश्र दुहेरीत बोपन्ना आगेकूच करण्यात यशस्वी ठरला. बोपन्ना व त्याची सहकारी कॅनडाची गॅब्रिएल दाब्रोवस्की या जोडीने केवळ ६७ मिनिटांमध्ये नोह रुबिन व जेमी लोएब या जोडीचा ७-५, ६-४ ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली.
पुरुष दुहेरीत पेस, बोपन्ना पराभूत
भारताचे पुरुष दुहेरीत अव्वल खेळाडू लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत आपापल्या जोडीदारांसह पराभव स्वीकारावा लागला, तर सानियाने क्रोएशियाच्या इव्हान डोडिगच्या साथीने मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.
पेस व जर्मनीचा त्याचा सहकारी आंद्रे बेगेमॅन यांना स्टिफन रॉबर्ट (फ्रान्स) व डुडी सेला (इस्राइल) या जोडीविरुद्ध ६-२, ५-७, ४-६ ने पराभव स्वीकारला. डेन्मार्कच्या फ्रेड्रिक नील्सनच्या साथीने खेळत असलेल्या बोपन्नाला अमेरिकेच्या ब्रायन बेकर व न्यूझीलंडच्या मार्कस डॅनियल या जोडीविरुद्ध २-६, ६-७ ने पराभवाला सामोरे जावे लागले.