जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत

By admin | Published: August 31, 2016 04:54 AM2016-08-31T04:54:29+5:302016-08-31T04:54:29+5:30

गत चॅम्पियन नोव्हाक जोकोविच दुखापतीतून सावरला असून, त्याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत दुसरी फेरी गाठली आहे.

Djokovic, Nadal in second round | जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत

जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत

Next

न्यूयॉर्क : गत चॅम्पियन नोव्हाक जोकोविच दुखापतीतून सावरला असून, त्याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत दुसरी फेरी गाठली आहे. स्पेनच्या राफेल नदाल व जर्मनीची एंजिलिक कर्बर यांनी उष्णतेचे आव्हान पेलताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजयी सलामी दिली. उष्णतेच्या त्रासामुळे फ्रेंच ओपन चॅम्पियन गार्बाइन मुगुरुजाला वैद्यकीय सेवा घ्यावी लागली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोविचने पोलंडच्या जर्जी जानोविजचा ६-३, ५-७, ६-२, ६-१ ने पराभव केला. आॅलिम्पिकदरम्यान मनगटाला झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलो नसल्याचे जोकोविचने कबूल केले. २०१० व २०१३ चा चॅम्पियन नदालने पहिल्या फेरीत उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनचा ६-१, ६-४, ६-२ ने पराभव केला. आता त्याला इटलीच्या आंद्रियास सेप्पीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
मनगटाच्या दुखापतीमुळे नदालला फे्रंच ओपनमधून लवकरच गाशा गुंडाळावा लागला होता. तो विम्बल्डन स्पर्धेत सहभागी झाला नव्हता, पण रिओ आॅलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक पटकावीत त्याने शानदार पुनरागमन केले. दुसरे मानांकन प्राप्त आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन कर्बर स्लोव्हेनियाच्या पोलोना हर्कोगविरुद्ध ६-०, १-० ने आघाडीवर असताना स्लोव्हेनियाच्या खेळाडूने माघार घेतली. आता कर्बरला क्रोएशियाच्या मिरजाना लुचिच बारोनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. तिसऱ्या मानांकित स्पेनच्या मुगुरुजाने बेल्जियमच्या एलिसे मटेसचा २-६, ६-०, ६-३ ने पराभव केला. मुगुरुजाला पहिल्या सेटमध्ये वैद्यकीय सेवा घ्यावी लागली. आता मुगुरुजाला लॅटव्हियाच्या अनास्तासिया सेवास्तोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. १३ व्या मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केतला पराभव स्वीकारावा लागला. ८४ वे मानांकन असलेल्या ब्रिटनच्या केली एडमंडने गास्के तचा ६-२, ६-२, ६-३ ने पराभव केला. २० वे मानांकन प्राप्त अमेरिकेच्या जॉन इस्नेरने मायदेशातील १८ वर्षीय सहकारी फ्रान्सिस टियाफोचा ३-६, ४-६, ७-६, ६-३, ७-६ ने पराभव केला. सातवे मानांकन प्राप्त क्रोएशियाच्या मारिन सिलिचने ब्राझीलच्या रोजेरियो डुट्रा सिल्वाचा ६-४, ७-५, ६-१ ने पराभव केला. १० व्या मानांकित फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सने लक्झेमबर्गच्या जाईल्स मूलरचा ६-४, ६-२, ७-६ ने पराभव केला.
२००४ ची चॅम्पियन स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाने ५८ मिनिटे रंगलेल्या लढतीत फ्रान्सिस्का शियावोनचा ६-१, ६-२ ने पराभव केला. पेत्रा क्वितोव्हाने येलेना ओस्तापेंकोवर ७-५, ६-३ ने सरशी साधली, तर दोनदा उपविजेती ठरलेली कॅरोलिन व्होझ्नियाकीने अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडची झुंज ४-६, ६-३, ६-४ ने मोडून काढली.


पात्रता फेरीचा अडथळा पार करीत मुख्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या भारताच्या साकेत मिनेनीला पहिल्या फेरीत संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला. चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लीविरुद्ध निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मिनेनीला पराभव पत्करावा लागला.
जागतिक क्रमवारीत १४३ व्या स्थानी असलेल्या मिनेनीला मानांकनामध्ये ४९ व्या स्थानी असलेल्या वेस्लीविरुद्ध ६-७, ६-४, ६-२, २-६, ५-७ ने पराभवाला सामोरे जावे लागले. मिनेनीने निर्णायक सेटच्या आठव्या गेममध्ये मॅच पॉइंट मिळवला होता, पण त्यानंतर स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला अधिक धावपळ करता आली नाही.
सलामी लढतीत मिनेनीने ३ तास ४७ मिनिट संघर्षपूर्ण खेळी केली; पण पहिल्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळताना त्याला विजयी सुरुवात करण्यात अपयश आले. पहिल्या फेरीत विजय मिळवला असता, तर त्याला दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली असती.
मिनेनीने चार सेटमध्ये शानदार खेळ केला. चौथ्या गेममध्ये त्याने वेस्लीची सर्व्हिस भेदली आणि आघाडी घेतली. पाचव्या सेटमध्ये त्याने ४-२ अशी आघाडी घेतली होती. दरम्यान, त्याला स्नायूच्या दुखापतीने सतावले. त्याला वैद्यकीय मदत घ्यावी लागली. त्यानंतर त्याने दोनदा सर्व्हिस गमावली. वेस्लीने या सेटमध्ये ७-५ ने सरशी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले.
वर्षाच्या अखेरच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत आता महिला दुहेरीत सातवे मानांकन प्राप्त सानिया मिर्झा व तिची चेकची सहकारी बारबोरा स्ट्राइकोव्हा यांना पहिल्या फेरीत अमेरिकन जोडी जाडा मी हार्ट व एना शिबारा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना डेन्मार्कचा सहकारी फ्रेडरिक नील्सनच्या साथीने उतरणार आहे. त्यांना पहिल्या फेरीत १६व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या रादेक स्तेपानेक व सर्बियाच्या नेनाद जिमोनजिच यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Djokovic, Nadal in second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.