जोकोविच दुसऱ्या फेरीत
By admin | Published: June 27, 2016 10:50 PM2016-06-27T22:50:30+5:302016-06-27T22:50:30+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने चौथ्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याच्या आपल्या अभियानास शानदार सुरुवात करताना
विम्बल्डन : व्हीनस विल्यम्सही विजयी
लंडन : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने चौथ्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याच्या आपल्या अभियानास शानदार सुरुवात करताना ब्रिटनच्या वाईल्ड कार्डप्राप्त खेळाडू जेम्स कार्डयाचा सोमवारी ६-0, ७-६, ६-४ असा पराभव करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
नवव्या मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिच आणि १३ व्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेरर यांनी पुरुष गटात आणि माजी चॅम्पियन आणि आठव्या मानांकित अमेरिकेच्या व्हीनस विलियम्सनेदेखील स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. नवव्या मानांकित अमेरिकेचा मेडिसन कीस हादेखील विजयी ठरला.
या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचने ब्रिटिश खेळाडूविरुद्धची लढत दोन तास तीन मिनिटांत जिंकली. जोकोविचने पहिला सेट एकही गेम न गमावता ६-0 जिंकला; परंतु दुसऱ्या सेटमध्ये मात्र त्याला संघर्ष करावा लागला. सर्बियन खेळाडूने हा सेट टायब्रेकरमध्ये ७-३ ने जिंकला. त्यानंतर त्याने तिसरा सेट ६-४ असा जिंकून दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.
माजी नंबर वन आणि विम्बल्डनमध्ये पाच वेळेस चॅम्पियन राहिलेल्या व्हीनसने क्रोएशियाच्या १९ वर्षीय डोना वेकिच हिचा १ तास ५२ मिनिटांत ७-६, ६-४ असा पराभव केला. व्हिनसला पहिला सेट जिंकण्यासाठी घाम गाळावा लागला आणि तिने हा सेट टायब्रेकमध्ये ७-३ असा जिंकला.
सिलीचने अमेरिकेच्या ब्रायन बेकर याचा १ तास ५0 मिनिटांत ६-३, ७-५, ६-३ आणि फेररने इस्रायलच्या डूडी सेला याचा १ तास १५ मिनिटांत ६-१, ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.
पहिल्या फेरीत सर्वाधिक सनसनाटी निकाल २१ व्या मानांकित जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबर पराभूत झाल्याने लागला. अमानांकित फ्रान्सच्या पियरे ह्यूज हर्बर हिने कोलश्रेबर हिच्यावर १ तास ५६ मिनिटांच्या चार सेटमध्ये रंगलेल्या लढतीत ७-६, ७-६, ६-४ असा खळबळजनक विजय मिळवला.
महिला गटात १४ व्या मानांकित आॅस्ट्रेलियाच्या सामंथा स्टोसूर हिने पोलंडच्या माग्दा लिनेट हिच्यावर १ तास १७ मिनिटांच्या लढतीत ७-५, ६-३ अशी मात करीत दुसरी फेरी गाठली तर २५ व्या मानांकित रोमानियाच्या इरीना बेगू हिला जर्मनीच्या कॅरिना विथोप्टकडून ६३ मिनिटांत १-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. जर्मनीच्या सेबाईन लिसिकीने अमेरिकेच्या सेल्बी रॉजर्सवर ५९ मिनिटांत ६-१, ६-३ अशी मात केली.