जोकोविच दुसऱ्या फेरीत
By Admin | Published: June 28, 2016 06:15 AM2016-06-28T06:15:58+5:302016-06-28T06:15:58+5:30
ब्रिटनचा वाईल्ड कार्डप्राप्त खेळाडू जेम्स कार्ड याचा सोमवारी ६-०, ७-६, ६-४ असा पराभव करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
लंडन : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने चौथ्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याच्या आपल्या अभियानाला शानदार सुरुवात करताना ब्रिटनचा वाईल्ड कार्डप्राप्त खेळाडू जेम्स कार्ड याचा सोमवारी ६-०, ७-६, ६-४ असा पराभव करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
नववा मानांकित क्रोएशियाचा मारिन सिलीच आणि १३वा मानांकित स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी पुरुष गटात आणि माजी चॅम्पियन व आठवी मानांकित अमेरिकेची व्हीनस विल्यम्सनेदेखील स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. नववा मानांकित अमेरिकेचा मेडिसन कीस हादेखील विजयी ठरला.
या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचने ब्रिटिश खेळाडूविरुद्धची लढत २ तास ३ मिनिटांत जिंकली. जोकोविचने पहिला सेट एकही गेम न गमावता ६-० असा जिंकला; परंतु दुसऱ्या सेटमध्ये मात्र त्याला संघर्ष करावा लागला. सर्बियन खेळाडूने हा सेट टायब्रेकरमध्ये ७-३ ने जिंकला. त्यानंतर त्याने तिसरा सेट ६-४ असा जिंकून दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. माजी नंबर वन आणि विम्बल्डनमध्ये पाच वेळेस चॅम्पियन राहिलेल्या व्हीनसने क्रोएशियाच्या १९ वर्षीय डोना वेकीच हिचा १ तास ५२ मिनिटांत ७-६, ६-४ असा पराभव केला. व्हीनसला पहिला सेट जिंकण्यासाठी घाम गाळावा लागला आणि तिने हा सेट टायब्रेकमध्ये ७-३ असा जिंकला. पहिल्या फेरीत सर्वाधिक सनसनाटी निकाल २१वी मानांकित जर्मनीची फिलिप कोलश्रेबर पराभूत झाल्याने लागला. बिगरमानांकित फ्रान्सची पियरे ह्यूज हर्बर हिने कोलश्रेबर हिच्यावर १ तास ५६ मिनिटांच्या ४ सेटमध्ये रंगलेल्या लढतीत ७-६, ७-६, ६-४ असा खळबळजनक विजय मिळविला. महिला गटात १४वी मानांकित आॅस्ट्रेलियाची सामंथा स्टोसूर हिने पोलंडची माग्दा लिनेट हिच्यावर १ तास १७ मिनिटांच्या लढतीत ७-५, ६-३ अशी मात केली.