जोकोविच तिसऱ्या फेरीत
By admin | Published: June 29, 2016 11:17 PM2016-06-29T23:17:43+5:302016-06-29T23:17:43+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने बुधवारी फ्रान्सच्या अॅड्रियन मॅनारिनो याचा ६-४, ६-३, ७-६ असा सलग सेटमध्ये पराभव करताना
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २९ : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने बुधवारी फ्रान्सच्या अॅड्रियन मॅनारिनो याचा ६-४, ६-३, ७-६ असा सलग सेटमध्ये पराभव करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली.
पावसामुळे सेंटर कोर्टमध्ये झाकलेल्या छताखाली जोकोविच आणि मॅनारिनो यांचा सामना झाला. चौथ्यांदा विम्बल्डन जिंकण्यासाठी उतरलेल्या जोकोविचने दोन तास ४ मिनिटांत आपली लढत जिंकली.
यावर्षी आॅस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकाविणाऱ्या २९ वर्षीय जोकोविचने पहिला सेट ६-४ ने जिंकला आणि दुसरा सेट ६-३ ने आपल्या नावावर केला. त्यानंतर २८ वर्षी मॅनारिनो याने तिसऱ्या सेटमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. जोकोविचसाठी विजयाचा मार्ग खडतर केला; परंतु जोकोविचने जबरदस्त खेळ करताना टायब्रेकमध्ये हा गेम ७-५ असा जिंकताना तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.
त्याआधी तृतीय मानांकित पोलंडच्या एग्निस्जका रदवांस्का आणि दहाव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्डिच यांनी आपापल्या लढती जिंकताना दुसरी फेरी गाठली. रदवांस्काने युक्रेनच्या कॅटरिना कोल्जोवा याला पावसाचा अडथळा आलेल्या सामन्यात ६३ मिनिटांत ६-२, ६-१ असे पराभूत केले. बेर्डिचने क्रोएशियाच्या इव्हान डोडिग याचे कडवे आव्हान ७-६, ५-७, ६-१, ७-६ असे मोडीत काढले. बेर्डिचला डोडिगविरुद्ध पहिली फेरी जिंकण्यासाठी तीन तास २४ मिनिटे संघर्ष करावा लागला.
बेर्डिचने पहिला सेट टायब्रेकरमध्ये ७-५ आणि चौथा सेट टायब्रेकरमध्ये ७-२ असा जिंकला. बेर्डिचची दुसऱ्या फेरीतील लढत जर्मनीच्या बेंजामिन बेकर याच्याशी होईल. बेकर याने काल अर्जेंटिनाच्या फाकुंडो बाग्निस याचा ६-३, ६-३, ६-१ असा सलग सेटमध्ये पराभव केला.
स्पर्धेच्या दिवशी पावसाचा अडथळा आला. त्यामुळे सामने थांबवावे लागले. पाऊस येण्याआधी झालेल्या अन्य दोन सामन्यांत जर्मनीच्या आंद्रिया पेत्कोविचने जपानच्या नाओ हिबिनो याचा ३-६, ७-५, ६-२ आणि रशियाच्या एवेगेनिया रोडिना याने युक्रेनच्या लिसिया सुरेंको याचा ६-३, ७-५ असा पराभव केला.