जोकोविच-वावरिंका जेतेपदासाठी झुंजणार
By admin | Published: September 11, 2016 12:45 AM2016-09-11T00:45:06+5:302016-09-11T00:45:06+5:30
जागतिक क्रमवारील अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारील अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव करीत यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जोकोविचला जेतेपदासाठी स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. वावरिंकाने दुसऱ्या उपांत्य लढतीत जपानच्या केई निशिकोरीचा पराभव केला.
आर्थर अॅश स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य लढतीत गतविजेत्या जोकोविचने १० व्या मानांकित मोंफिल्सचा ६-३, ६-२, ३-६, ६-२ ने पराभव केला. मोंफिल्सला जोकोविचविरुद्ध कारकिर्दीतील १३ सामन्यांमध्ये एकदाही विजय मिळवता आला नाही.
२००८ मध्ये फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा मोंफिल्स ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत खेळत होता. कोर्टवर हेतुपुरस्सरपणे वेळकाढूपणाचे धोरण अवलंबनाऱ्या मोंफिल्सला प्रेक्षकांच्या हुटिंगलाही सामोरे जावे लागले.
जोकोविच या स्पर्धेत आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळला. कारण त्याला एका प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून वॉक ओव्हर मिळाला तर दोन खेळाडूंनी अर्ध्यावर लढतीतून माघार घेतली होती. यंदा आॅस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचला यूएस ओपनच्या जेतेपदासाठी तिसऱ्या मानांकित स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
तिसऱ्या मानांकित वावरिंकाने दुसऱ्या उपांत्य लढतीत सहव्या मानांकित निशिकोरीचा ४-६, ७-५, ६-४, ६-२ ने पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळवले. निशिकोरीने यापूर्वी धक्कादायक निकालाची नोंद करताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला व दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या ब्रिटनच्या अॅन्डी मरेचा पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते.
२९ वर्षीय जोकोविच रविवारी वावरिंकाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढती तिरस्यांदा यूएस ओपनचे व कारकिर्दीतील १३ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. जोकोविचची वावरिंकाविरुद्धची कामगिरी १९-४ अशी आहे. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत वावरिंकाने जोकोचा पराभव केला होता. (वृत्तसंस्था)