जोकोविच, वावरिन्काचे विजय अभियान सुरू
By admin | Published: January 20, 2015 11:56 PM2015-01-20T23:56:46+5:302015-01-20T23:56:46+5:30
जोकोविच, डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाकी, बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सरशी साधून आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला़
मेलबर्न : गत चॅम्पियन स्वीत्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिंका, जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाकी, बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सरशी साधून आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला़
पुरुष गटातील एकेरी सामन्यात चौथे मानांकनप्राप्त वावरिंका याने स्पर्धेत शानदार सलामी देताना तुर्कीच्या मार्सेल इल्हान याच्यावर अवघ्या ९० मिनिटांत ६-१, ६-४, ६-२ अशी सरशी साधली़
जगातील अव्वल खेळाडू जोकोविच याने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत स्लोवेनियाचा क्वालिफायर खेळाडू एल्जाज बेदेनेचे आव्हान सरळ सेटमध्ये ६-३, ६-२, ६-४ असे मोडीत काढले़ हा सामना तब्बल २ तास रंगला़ जोकोविचने चार वेळा स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे़ आता पाचव्यांदा तो स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरला आहे़
महिला गटातील पहिल्या फेरीच्या लढतीत आठवे मानांकनप्राप्त कॅरोलिन वोज्नियाकी हिने अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंड हिचा ७-६, ६-२ असा पराभव करीत स्पर्धेत आगेकूच केली, तर व्हिक्टोरिया अझारेंका हिने अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सचा ६-२, ६-२ अशा फरकाने पराभव करून पुढची फेरी गाठली़ आता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझारेंका आणि वोज्नियाकी आमने सामने येणार आहे़
पुरुष गटातील अन्य लढतीत कॅनडाच्या मिलोस राओनिक याने इलिया मारचेंकोवर ७-६, ७-६, ६-३ अशा फरकाने मात केली़ स्पेनच्या डेव्हिड फेरर याने ब्राझीलच्या थॉमस बलुची याला ६-७, ६-२ अशा फरकाने घरचा रस्ता दाखविला़
पाचवे मानांकनप्राप्त जपानच्या केई निशिकोरी याने स्पेनच्या निकोलस अल्मार्गोवर ६-४, ६-७, २-६ असा विजय मिळवून स्पर्धेची दुसरी फेरी गाठली़ महिला गटातील अन्य सामन्यांत ११ वे मानांकनप्राप्त स्लोवाकियाच्या डोमिनिका सिबुलकोव्हा हिने बेल्जियमच्या कस्टर्न फ्लिपकेन्स हिला ३-६, ६-३, ६-१ अशा फरकाने धूळ चारली, तर २० वे मानांकनप्राप्त झेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोवा हिने हॉलंडच्या रिशेल होगेनकँप हिचा ६-१, ६-४ असा फडशा पाडला़ २० वे मानांकनप्राप्त आॅस्ट्रेलियाच्या समांता त्सोसुर हिने मोनिका निकेलेस्क्यू हिच्यावर ६-४, ६-१ असा विजय मिळविला़ सहावे मानांकनप्राप्त पोलंडच्या अग्निस्का रंदवास्का हिने जबरदस्त खेळ
करताना जपानच्या कुरूमी नारा हिचा ६-३, ६-० असा पराभव करीत आगेकूच केली़(वृत्तसंस्था)
सेरेना विल्यम्सचाही विजय
आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला गटात अव्वल मानांकनप्राप्त अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने पहिल्या फेरीत सहज विजय मिळविला़ सेरेनाने एकेरीत आपल्या आक्रमक खेळाच्या बळावर बेल्जियमच्या एलिसन वान उटीवांक हिचा ६-०, ६-४ अशा फरकाने पराभव करीत आगेकूच केली़
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळविल्याचा आनंद आहे़ या सामन्यात बऱ्याच चुकासुद्धा झाल्या़ आता पुढच्या फेरीत चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दखल घेईऩ तसेच खेळाचा स्तरही उंचवावा लागेल़
- नोव्हाक जोकोविच
टेनिसपटू, सर्बिया