विजयी सांगतेसाठी जोकोविच; मरे उत्सुक
By admin | Published: November 13, 2016 02:31 AM2016-11-13T02:31:36+5:302016-11-13T02:31:36+5:30
नुकतेच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेला ब्रिटनचा अॅँडी मरे व सर्बियाचा नोवाक जोकोविच एटीपी टूर फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकून या वर्षाच्या शेवटच्या सत्राची विजयी
लंडन : नुकतेच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेला ब्रिटनचा अॅँडी मरे व सर्बियाचा नोवाक जोकोविच एटीपी टूर फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकून या वर्षाच्या शेवटच्या सत्राची विजयी सांगता करण्यासाठी उत्सुक असणार आहेत. ही स्पर्धा जिंकून अव्वल स्थानावर राहण्यासाठी दोघांचीही चढाओढ असणार आहे.
मरे व जोकोविच हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. जोकोविचने या वर्षी आॅस्ट्रेलिया ओपन स्पर्धा जिंकून विजयी सुरुवात केली होती, तर मरेने विम्बल्डन व आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून आपली क्षमता दाखवून दिली आहे. या दोघांमध्ये १५ वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. मरे याने पॅरिस मास्टर्स स्पर्धा जिंकून जोकोविच याच्याकडे १२२ आठवड्यांपासून असलेले नंबर वनचे पद काढून घेतले आहे. मरे अव्वल क्रमांकावर असला तरी तो जोकोविचपेक्षा ४०५ गुणांनीच पुढे आहे. जर मरे या स्पर्धेत जोकोविचपेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही, तर पुन्हा जोकोविच अव्वल स्थानी विराजमान होणार आहे.
आठ खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत मरे व जोकोविच यांना वेगवेगळ्या गटांत स्थान मिळाले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीपर्यंत या दोघांमध्ये सामना होणार नाही. ही स्पर्धा जिंकून नंबर वनचे स्थान पटकावण्यासाठी दोघे प्रयत्नशील आहेत. जोकोने चार वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. रॉजर फेडरर व राफेल नदाल यांच्या अनुपस्थितीत या दोन खेळाडूंची लढत रोमांचक असणार आहे. (वृत्तसंस्था)