जोकोविचचा करिअर ‘स्लॅम’
By admin | Published: June 6, 2016 02:33 AM2016-06-06T02:33:22+5:302016-06-06T02:33:22+5:30
नोव्हाक जोकोविच याने ब्रिटनच्या अँडी मरेचे कडवे आव्हान ३-६, ६-१, ६-२, ६-४ असे परतावून कारकिर्दीत प्रथमच फ्रेंच ओपन चॅम्पियनचा बहुमान मिळवला.
पॅरिस : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना द्वितीय मानांकित ब्रिटनच्या अँडी मरेचे कडवे आव्हान ३-६, ६-१, ६-२, ६-४ असे परतावून कारकिर्दीत प्रथमच फ्रेंच ओपन चॅम्पियनचा बहुमान मिळवला. या शानदार जेतेपदासह त्याने करिअर ग्रँडस्लॅमही पूर्ण केले. या दिमाखदार कामगिरीनंतर प्रेक्षकांनी उभे राहून जोकोविचचे अभिनंदन केले.
मरेने उपांत्य फेरीत गतचॅम्पियन आणि तृतीय मानांकित स्वित्झर्लंडच्या स्टेनिस्लास वावरिंकाचे आव्हान मोडीत काढले होते. अंतिम सामन्यात त्याने पहिला सेट जिंकून जोकोविचला धोक्याचा इशारा दिला. परंतु चॅम्पियन जोकोने मरेला विजेतेपदाची संधी मिळू दिली नाही.
पहिला सेट ३-६ ने गमावल्यानंतर जोकोविचने दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त मुसंडी मारली. जोकोने दुसऱ्या सेटमध्ये मरेच्या चुकीचा फायदा घेताना सर्व्हिस भेदली. दुसरा सेट ६-१ ने जिंकताना जोकोने सामना बरोबरीत आणला.
तिसऱ्या सेटमध्येही दुसऱ्या सेटसारखी परिस्थिती होती आणि जोकोविचने सुरुवातीलाच ब्रेक मिळवताना ३-० अशी भक्कम आघाडी घेतल्यानंतर ५-१ अशी सरशी केली. मरेने सातव्या गेममध्ये आपली सर्व्हिस कायम ठेवताना ही आघाडी २-५ अशी कमी केली; परंतु आठव्या गेमसह जोकोविचने सहज जिंकताना हा सेट ६-२ असा जिंकून २-१ अशी आघाडी मिळवली.
यानंतर जोकोने सुसाट खेळ केला. मरेला पुनरागमनाची कोणतीही संधी न देता सलग दोन सेट जिंकत आपले पहिलेवहिले फ्रेंच विजेतेपद साकारले. दरम्यान, चौथ्या सेटमध्ये मरेने काही प्रमाणात कडवा प्रतिकार करताना जोकोला झुंजवले. मात्र जोकोने मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम राखताना हातातील विजेतेपद निसटू दिले नाही.(वृत्तसंस्था)
जोकोचा
बोलबाला...
जोको व मरेदरम्यान या वर्षी चौथी फायनल लढत झाली. जोकोने आॅस्ट्रेलियन ओपन व माद्रिद मास्टर्सच्या विजेतेपदाच्या लढतीत मरेला पराभूत केले होते, तर मरेने जोकोला रोम मास्टर्सच्या फायनलमध्ये नमवले होते. तसेच जोकोने मरेला फ्रेंच ओपनमध्ये पराभूत करून करिअरमध्ये २४-१० आणि क्ले कोर्टवर ४-१ अशी आघाडी घेतली आहे.
१२वे ग्रँडस्लॅम
एकूण १२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावताना जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या आॅलटाईम यादीत संयुक्तपणे आॅस्ट्रेलियाच्या रॉय एमर्सन यांच्यासह तिसरे स्थान पटकावले आहे. अमेरिकेच्या पीट सॅम्प्रास आणि स्पेनचा राफेल नदाल यांनी प्रत्येकी १४, तर स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सर्वाधिक १७ ग्रँडस्लॅम पटकावले आहेत.
आठवा अजूबा...
टेनिसविश्वात चारही मानाच्या ग्रँडस्लॅम जिंकून करिअर स्लॅम पूर्ण करणारा नोव्हाक जोकोविच आठवा खेळाडू ठरला. १९३५ मध्ये ब्रिटनचे दिग्गज फ्रेड पेरी यांनी सर्वप्रथम करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले. त्यानंतर डॉन बज (अमेरिका, १९३८), रॉड लेवर (आॅस्टे्रलिया, १९६२), रॉय एमर्सन (आॅस्टे्रलिया, १९६४), आंद्रे अगासी (अमेरिका, १९९९), रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड, २००९), राफेल नदाल (स्पेन, २०१०) आणि त्यानंतर नोव्हाक जोकोविच यांनी करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केला आहे.
जोकोविचने फ्रेंच ओपन पटकावून आॅस्ट्रेलियाच्या रॉड लेवर व स्वीडनच्या बियार्न बोर्ग यांना मागे टाकले. या दोघांच्या नावावर प्रत्येकी ११ ग्रँडस्लॅम होते. जोकोविचने आता सहा आॅस्ट्रेलियन, तीन विम्बल्डन, दोन यूएस ओपन आणि एक फ्रेंच ओपन विजेतेपदांसह एकूण १२ ग्रँडस्लॅम पटकावले आहेत.
ऐतिहासिक कामगिरीपासून मरे वंचित
मरे १९३७ मध्ये बन्नी आॅस्टिन यांच्यानंतर फ्रेंच ओपन फायनल गाठणारा पहिला ब्रिटिश खेळाडू बनला होता; परंतु तो विजेतेपदापासून वंचित राहिला. विशेष म्हणजे, मरेने २०१३ मध्ये जोकोविचला विम्बल्डन फायनलमध्ये पराभूत करीत आपल्या देशासाठी पुरुष विम्बल्डन चॅम्पियनच्या ७७ वर्षांची प्रतीक्षा संपवली होती; परंतु येथे ही किमया तो करू शकला नाही.