जोकोविचचा संघर्षपूर्ण विजय

By Admin | Published: September 8, 2015 04:49 AM2015-09-08T04:49:18+5:302015-09-08T04:49:18+5:30

जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राबर्टो बातिस्ता आगुटविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवून सलग २६ व्या वेळी ग्रॅण्डस्लॅम

Djokovic's fierce victory | जोकोविचचा संघर्षपूर्ण विजय

जोकोविचचा संघर्षपूर्ण विजय

googlenewsNext

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राबर्टो बातिस्ता आगुटविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवून सलग २६ व्या वेळी ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. जोकोविचने या लढतीत ६-३, ६-४, ६-३ ने विजय मिळविला. उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचला फेलिसियानो लोपेजच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जोकोविचने यूएस ओपनमध्ये सलग नवव्यांदा अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.
दुसऱ्या सेटमध्ये जोकोविच एकवेळ ४-२ ने आघाडीवर होता; पण एके काळी स्पेनच्या विल्लारियलमध्ये ज्युनिअर फुटबॉलपटू असलेल्या २३ वर्षीय आगुटने त्यानंतर सलग ४ गेम जिंंकून सेटमध्ये सरशी साधली. जोकोविचने त्यानंतर सलग दोन्ही सेट जिंकून अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले. या लढतीत ४२ विनर लगावताना ३७ टाळण्याजोग्या चुका करणारा जोकोविच म्हणाला, ‘‘आगुटने संघर्षपूर्ण खेळ केला. माझ्याकडे दुसऱ्या सेटमध्ये ५-२ अशी आघाडी घेण्यासाठी दोन ब्रेकपॉर्इंट होते; पण मला त्याचा लाभ घेता आला नाही.’’
३३ वर्षीय लोपेजने १४ व्या प्रयत्नात प्रथमच यूएस ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश मिळविले. त्याने यापूर्वीच्या फेरीत राफेल नदालचा पराभव करणाऱ्या इटलीच्या फॅबियो फॉगनिनीचा ६-३, ७-६, ६-१ ने पराभव केला. विद्यमान चॅम्पियन मारिन सिलिचही उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याला जो विल्फ्रेड त्सोंगाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सिलिचने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीचा ६-३, २-६, ७-६, ६-१ ने पराभव करून चौथ्यांदा यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.
नववे मानांकनप्राप्त क्रोएशियाच्या सिलिचचा या स्पर्धेतील हा सलग ११ वा विजय ठरला. त्याने गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये कारकिर्दीतील पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले होते. दुसऱ्या सेटमध्ये त्याला टाचेच्या दुखापतीने सतावले; पण त्यातून तो लवकरच सावरला.
सामन्यात २३ एस व ५२ विनर लगावणारा सिलिच म्हणाला, ‘‘दुसऱ्या सेटमध्ये टाचेच्या दुखापतीने सतावले; पण माझ्या हालचालीमध्ये काही फरक पडणार नाही याची मी काळजी घेतली.’’ १९ व्या मानांकित फ्रान्सच्या त्सोंगाने यूएस ओपन स्पर्धेत दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने मायदेशातील सहकारी व बिगरमानांकित बेनोइट पियरेचा ६-४, ६-३, ६-४ ने पराभव केला.

सेरेना-व्हीनस उपांत्यपूर्व फेरीत झुंजणार
सेरेना आणि व्हीनस विल्यम्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवित महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या दोन भगिनींदरम्यान यूएस ओपनची उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. कॅनडाच्या बुचार्डने दुखापतीमुळे चौथ्या फेरीच्या लढतीतून माघार घेतली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेनाने रविवारी रात्री मायदेशातील सहकारी व १९ वे मानांकन प्राप्त अमेरिकेच्या मेडिसन किजचा ६-३, ६-३ ने पराभव करीत अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले. कॅलेंडर ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्यासाठी सेरेनाला आता केवळ तीन विजयांची गरज आहे. सेरेनाला उपांत्यपूर्व फेरीत थोरली बहीण व्हीनसच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. व्हीनसने एस्तोनियाची क्वालिफायर एनेट कोंटाविटचा ६-२, ६-१ ने पराभव केला. सेरेनाची नजर स्टेफी ग्राफनंतर (१९८८)ओपन युगात एक वर्षात चारही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकणारी दुसरी महिला खेळाडू ठरण्यावर केंद्रित झाली आहे.’’ बुचार्ड शुक्रवारी महिलांच्या लॉकर रूममध्ये घसरून पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे बुचार्डने इटलीच्या रॉबर्टा विन्सीविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली. यापूर्वी बुचार्डने मिश्र दुहेरी व महिला दुहेरीतूनही माघार घेतली होती. 

सानिया-मार्टिना उपांत्यपूर्व फेरीत
भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची तिची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी तिसऱ्या फेरीच्या लढतीत सहज विजयाची नोंद करताना महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सानिया-मार्टिना या अव्वल मानांकित जोडीने नेदरलँडची मिशेला क्राइसेक व झेक प्रजासत्ताकची बारबोरा स्टरिकोव्हा या १३ व्या मानांकित जोडीचा ६९ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-३, ६-० ने पराभव केला. सानिया-मार्टिना जोडीने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवताना एकदाही सर्व्हिस गमावली नाही.
पहिल्या सेटमध्ये अव्वल मानांकित जोडीने आपल्या प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस एकदा भेदली आणि १४ विनर्स लगावले. याउलट, क्राइसेक व स्टरिकोव्हा यांना केवळ ८ विनर्स लगावता आले. पहिला सेट ३३ मिनिटे रंगला. क्राइसेक व स्टरिकोव्हा यांनी दुसऱ्या सेटमध्ये अनेक चुका केल्या. सहा वेळा त्यांची सर्व्हिस भेदण्याची स्थिती निर्माण झाली होती.
सानिया-मार्टिना जोडीने तीन वेळा ब्रेक पॉर्इंटवर गुण वसूल केला. क्राइसेक व स्टरिकोव्हा यांनी ९ टाळण्याजोग्या चुका करताना सानिया-मार्टिना जोडीला एक प्रकारे विजयाची भेट दिली. दुसरा सेट केवळ २६ मिनिटांमध्ये संपला.
सानिया-मार्टिना जोडीला यानंतर चिनी-तैपेईची युंग
जान चान व हाओ चिंग चान या नवव्या मानांकित जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या जोडीने अन्य लढतीत इरिना कॅमिलिया बेगू व रालुका ओलारू या रुमानियाच्या जोडीचा ५-७, ६-१, ७-६ ने पराभव केला.

Web Title: Djokovic's fierce victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.