माद्रिद ओपनमध्ये जोकोविचचे विक्रमी जेतेपद
By admin | Published: May 9, 2016 07:57 PM2016-05-09T19:57:09+5:302016-05-09T19:57:09+5:30
सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ब्रिटनच्या अॅण्डी मरेला अंतिम फेरीत नमवून २९ वेळा माद्रिद ओपन मास्टर्स किताब जिंकण्याची कामगिरी केली
ऑनलाइन लोकमत
माद्रिद, दि. 9- जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ब्रिटनच्या अॅण्डी मरेला अंतिम फेरीत नमवून २९ वेळा माद्रिद ओपन मास्टर्स किताब जिंकण्याची कामगिरी केली आहे.
अंतिम फेरीत जोकोविचने मरेला ६-२, ३-६, ६-३ असे नमवून जेतेपदावर मोहोर उमटवली. मरे जेतेपदाचा किताब राखण्यासाठी मैदानात उतरला होता; मात्र तो जोकोविचचे आव्हान परतविण्यात अपयशी ठरला. जोकोविचचे या वर्षातील हे पाचवे जेतेपद ठरले आहे. यापूर्वी कतार ओपन, इंडियन वेल्स, मियामी ओपन व आॅस्ट्रेलियन ओपन किताब संपादन केला होता.
मरेने उपांत्य फेरीत स्पेनच्या राफेल नदालला, तर जोकोविचने केई निशिकोरी याला नमवून अंतिम फेरी गाठली होती. नदालला विजेतेपदाचा दावेदार मानण्यात येत होते. मात्र, मरेने त्याचे आव्हान परतवून लावत आपणच किताब राखणार असल्याचे संकेत दिले. मात्र, जोकोविचने त्याच्याकडून किताब खेचून आणला.
जोकोविचने पहिल्याच सेटमध्ये मरेची सर्व्हिस तिनदा भेदून त्याला भक्कम आव्हान दिले. मरेने पहिला सेट २-६ने गमविल्यानंतरही झुंज दिली. दुसरा सेट त्याने ६-३ असा नावावर करून आव्हान कायम ठेवले. मात्र, अखेरचा सेट जोकोविचने ६-३ने जिंकून किताब नावावर केला. जोकोविचने २०११मध्ये या किताबावर मोहोर उमटविली होती.
किताब जिंकल्यानंतर जोकोविच म्हणाला, ‘‘दहा वर्षांपूर्वी याच स्पर्धेत आम्ही (मरे) पहिल्यांचा खेळलो होतो. त्या वेळी आमची लढत अंतिम सोळांमध्ये झाली होती. आता आम्ही दोघेही जागतिक क्रमवारीत शीर्ष स्थानी असलेले खेळाडू आहोत. त्या वेळी आम्ही हा विचार केलादेखील नव्हता. मरे व मी एकमेकांना वयाच्या १२व्या वर्षापासून ओळखत आहे. युवा खेळाडू असल्यापासून आमच्यात जिंकण्याची जबरदस्त भूक असायची.’’
या पराभवामुळे मरेचे जागतिक क्रमवारीत एका क्रमांकाने नुकसान झाले असून, तो दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर गेला. रॉजर फेडररने दुसऱ्या क्रमांकावर वर्णी साधली आहे.
मरे म्हणाला, ‘‘काही वर्षांपासून जोकोविच खूपच चांगले टेनिस खेळत आहे. त्यामुळे तो या विजेतेपदाचा खरा मानकरी आहे. त्याने बिनतोड सर्व्हिस व चांगला खेळ केला. त्यामुळे तो अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे.’’ (वृत्तसंस्था)
=======================
सर्बियाच्या २८ वर्षीय जोकोविचने कारकिर्दीतील ६४वा किताब नावावर केला आहे. त्याने महान टेनिसपटू पीट सॅम्प्रास व जोर्न बोर्ग यांच्याशी बरोबरी केली आहे. याविषयी जोकोविच म्हणाला, ‘‘या महान खेळाडूंच्या रांगेत स्वत:ला पाहून खूप आनंद होतोय. खासकरून मी ज्या खेळाडूचे अनुकरण करीत आलोय त्या सॅम्प्रासच्या रांगेत पाहून खूपच आनंदित झालोय.’’