जोकोविचचा विजेतेपदाचा चौकार

By admin | Published: November 24, 2015 12:24 AM2015-11-24T00:24:44+5:302015-11-24T00:24:44+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने अंतिम फेरीत रॉजर फेडररला पराभूत करीत सलग चौथ्यांदा एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले.

Djokovic's winning streak | जोकोविचचा विजेतेपदाचा चौकार

जोकोविचचा विजेतेपदाचा चौकार

Next

लंडन : जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने अंतिम फेरीत रॉजर फेडररला पराभूत करीत सलग चौथ्यांदा एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले.
२८ वर्षीय जोकोविचने सहाव्यांदा चॅम्पियन फेडररचा सलग सेटस्मध्ये ६-३, ६-४ असा पराभव केला आणि अव्वल आठ मानांकित खेळाडू दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत आपणच ‘किंग’ आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले. त्याचबरोबर तो स्पर्धेच्या ४६ वर्षांच्या इतिहासात सलग चार वेळेस विजेता ठरणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
यावर्षी तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकाविणाऱ्या जोकोविचला पहिला सेट ६-३ जिंकण्यात फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.
दुसऱ्या सेटमध्ये या दोन्ही खेळाडूंदरम्यान खूप संघर्ष पाहायला मिळाला. सेटमध्ये ३-४ पिछाडीवर पडल्यानंतर फेडररने सलग पाच गुण घेताना मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला; परंतु चॅम्पियनप्रमाणे खेळणाऱ्या जोकोविचने फेडररला चुका करण्यास भाग पाडले. विजेतेपद जिंकून वर्षाचा जबरदस्त समारोप केल्यानंतर जोकोविचने म्हटले, ‘मी ग्रुप लढतीत मिळालेल्या पराभवातून धडा घेतला आणि या लढतीत जास्त परतीचे फटके मारले. ट्रॉफी जिंकण्याने या हंगामाचा समारोप करणे यापेक्षा जास्त काही चांगले होऊ शकत नाही. हे सत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे.’
या विजयामुळे जोकोविचचे फेडररविरुद्ध कारकिर्दीतील रेकॉर्ड २२-२२ असे झाले आहे. चॅम्पियन खेळाडूने उपांत्य फेरीत स्पेनच्या राफेल नदाललादेखील धूळ चारली होती. त्याच्याविरुद्ध त्याचे रेकॉर्ड २३-२३ असे झाले आहे.
दुसरीकडे १७ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन फेडरर पराभवानंतर म्हणाला, ‘जोकोविचने कोर्टवर सुरेख खेळ केला. तथापि, मी पहिला सेट गमाविल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्नदेखील केला; परंतु यश मिळाले नाही. जोकोविचचे अभिनंदन; परंतु त्याला अव्वल राहण्यासाठी खूप मेहनत करण्याची आणि दुखापतीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.’

Web Title: Djokovic's winning streak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.