आनंद-नकामुरा लढत अनिर्णीत
By admin | Published: June 16, 2017 04:00 AM2017-06-16T04:00:27+5:302017-06-16T04:00:27+5:30
माजी विश्व चॅम्पियन आनंदने अलीबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नकामुराला बरोबरीत रोखले.
स्टावेंगर : माजी विश्व चॅम्पियन आनंदने अलीबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नकामुराला बरोबरीत रोखले.
यापूर्वीच्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाविरुद्ध विजय नोंदविल्यानंतर आनंदने पुन्हा एकदा नकामुराविरुद्ध चांगला खेळ केला, पण अमेरिकन बुद्धिबळपटू आनंदच्या आव्हानाला उत्तर देण्यास सज्ज होता.
आर्मेनियाच्या लेव्होन आरोनियनने रशियाच्या सर्गेई कार्जाकिनचा पराभव करीत स्पर्धेत आपला तिसरा विजय नोंदवला. या विजयसह तो या स्पर्धेत प्रथमच एकमेव आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरला.
नेदरलँडच्या अनिस गिरीने फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर लाग्रेव्हाचा पारभव केला. दिवसातील सर्वांत सनसनाटी निकाल म्हणजे मॅग्नस कार्लसनला रशियाच्या व्लादीमीर क्रॅमनिकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल कार्लसनसाठी नुकसानदायक ठरू शकतो. त्याला अव्वल स्थान गमवावे लागण्याची शक्यता आहे.
सातव्या फेरीअखेर आरोनियनने पाच गुणांसह एकमेव आघाडी घेतली आहे.
तो स्पर्धेत सुरुवातीला आघाडीवर असलेल्या नकामुरापेक्षा अर्ध्या गुणाने आघाडीवर आहे. क्रॅमनिक व गिरी प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. अमेरिकेचा वेस्ली सो त्याच्यापेक्षा एका गुणाने पिछाडीवर आहे तर आनंद, कार्जाकिन व कारुआना प्रत्येकी तीन-तीन गुणांसह संयुक्तपणे सहाव्या स्थानी आहेत.
विश्व चॅम्पियन कार्लसन फ्रान्सच्या वाचियर लाग्रेव्हच्या साथीने अखेरच्या स्थानी आहे.
(वृत्तसंस्था)