नायकाला ‘खलनायक’ संबोधूू नका!
By admin | Published: June 27, 2015 12:54 AM2015-06-27T00:54:21+5:302015-06-27T00:54:21+5:30
बांगलादेशविरुद्ध मालिका गमाविल्यानंतर महेंद्रसिंह धोनीवर टीकेची झोड उठली. यावर पाक टी-२० संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने धोनीची बाजू घेतली
कोलकाता : बांगलादेशविरुद्ध मालिका गमाविल्यानंतर महेंद्रसिंह धोनीवर टीकेची झोड उठली. यावर पाक टी-२० संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने धोनीची बाजू घेतली. भारतीय वन डे कर्णधाराला एक मालिका गमाविल्यामुळे खलनायक संबोधू नका, असे त्यांनी भारतीय क्रिकेटशौकिनांना आवाहन केले.
एका पराभवानंतर आवडत्या खेळाडूवर टीकेचा भडिमार करणे ही भारतीय उपखंडाची परंपरा असल्याचे संबोधून आफ्रिदी म्हणाला,‘बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर धोनीसोबत जो व्यवहार होत आहे, ते पाहून मला वाईट वाटले. एखादा वाईट पराभव आपल्या आवडत्या खेळाडूला खलनायक बनवून जातो, ही भारतीय उपखंडातील परंपरा संपायला हवी. खराब चित्र निर्माण करण्यासाठी मीडियादेखील जबाबदार आहे.’ आफ्रिदीलादेखील त्याच्या देशात अनेकदा अशा प्रकारच्या अपमानास्पद वागणुकीस सामोरे जावे लागले. कर्णधाराच्या कामगिरीचे आकलन करा; पण त्याच्या मागच्या कामगिरीकडेही लक्ष द्या. याआधी देशाला या व्यक्तीने किती सन्मान मिळवून दिला, हे विसरू नका. धोनी भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. त्याचा रेकॉर्ड सर्व काही कथन करतो.’
भविष्यातील भारतीय संघ बांधण्याचे श्रेय धोनीला जाते, असे सांगून आफ्रिदी पुढे म्हणाला, ‘धोनीने बांधलेला भविष्यातील भारतीय संघ बलाढ्य आहे. या संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत.’ पाककडून यापुढे केवळ टी-२० क्रिकेट खेळणारा आफ्रिदी संघाच्या भविष्याबाबत आशावादी दिसला. तो म्हणाला, ‘अलीकडे काही वर्षांत पाकच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सुधारणा झाली. त्यामुळेच राष्ट्रीय संघासाठी चांगले खेळाडू मिळत आहेत. आमचा संघ काही वर्षांत आणखी चांगला होईल.’ (वृत्तसंस्था)