कोरोनाआड डोपिंग दडवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 04:51 AM2020-04-08T04:51:34+5:302020-04-08T04:51:40+5:30
डाचे अध्यक्ष बांका यांचा खेळाडूंना इशारा : बचावाची संधी नाही
वा
लंडन: कोरोना व्हायरसच्या आड डोपिंगपासून पळ काढू नका, असा इशारा देत विश्व डोपिंगविरोधी एजन्सीचे (वाडा) अध्यक्ष विटोल्ड बांका यांनी डोपिंगबाबत कुठलीही माहिती दडविणे म्हणजे स्वत:शी खोटे बोलणे होय, असे म्हटले आहे.
कोरोनामुळे खेळाडूंची शारीरिक चाचणी थांबू शकते मात्र वाडा तसेच प्रत्येक देशातील राष्टÑीय डोपिंग एजन्सीकडे अशी काही साधने आहेत ज्यामुळे डोपिंगला आळा घालता येणे शक्य असल्याचे बांका यांनी म्हटले आहे.
कॅनडा आणि रशियाने कोरोनामुळे डोप परीक्षण थांबवत असल्याची घोषणा केली. ब्रिटनच्या डोपिंग विरोधी एजन्सीनही चाचणी परीक्षण कमी केले आहेत. बांका यांनी १ जानेवारी रोजी क्रेग रीडी यांच्याकडून वाडाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. कोरोनाचे संकट लवकरच संपेल आणि वाडाचे परीक्षण पूर्वीप्रमाणे सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘डोपिंग परीक्षण हे आमचे एकमेव शस्त्र नाही. अन्य स्त्रोतही आहेत. खेळाडूंचा जैविक पासपोर्ट आम्हाला त्यांच्याबाबत सर्व माहिती पुरवतो. याशिवाय खेळाडूंच्या नमुन्यांचे दीर्घकालिन विश्लेषण करण्याचीही सोय आहे. आम्ही खेळाडूंच्या परीक्षणासाठी जाणार नसू तरी खेळाडूंनी स्वत:च्या वास्तव्याचे ठिकाण सांगणे बंधनकारक आहे.’ बांका हे सर्वच क्रीडा महासंघासोबत चर्चा करीत आहेत. कोरोनामुळे डोपिंग परीक्षण थांंबले असले तरी खेळाडूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय डोपिंग एजन्सीची देखील आहे, हे प्रत्येक देशाला पटवून देत आहेत. (वृत्तसंस्था)
‘ कोरोना कुणालाही डोपिंगपासून बचावाची संधी देत नाही. ही धोका देण्याची वेळ आहे, असा विचार खेळाडूंनी करू नये. वाडाद्वारे अशा खेळाडूंना पकडण्यासाठी दुसऱ्या उपाययोजना करता येतील.’
- विटोल्ड बांका, अध्यक्ष, वाडा