शॉर्टकट घेऊ नका, मेहनतीला पर्याय नाही- गौरव शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 12:44 AM2018-11-21T00:44:10+5:302018-11-21T00:46:59+5:30

शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा अत्यंत आव्हानात्मक खेळ म्हणून पॉवरलिफ्टिंगची ओळख आहे. शारीरिक शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होणाऱ्या पॉवरलिफ्टिंगमध्ये मांसाहार अनिवार्य असल्याचा समज अनेकांमध्ये असतो.

 Do not take shortcut, no hard work - Gaurav Sharma | शॉर्टकट घेऊ नका, मेहनतीला पर्याय नाही- गौरव शर्मा

शॉर्टकट घेऊ नका, मेहनतीला पर्याय नाही- गौरव शर्मा

Next

मुंबई : शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा अत्यंत आव्हानात्मक खेळ म्हणून पॉवरलिफ्टिंगची ओळख आहे. शारीरिक शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होणाऱ्या पॉवरलिफ्टिंगमध्ये मांसाहार अनिवार्य असल्याचा समज अनेकांमध्ये असतो. मात्र हा एक गैरसमज असून शुद्ध शाकाहार केल्यानेही तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरू शकता, असा नवा विश्वास पॉवरलिफ्टिंगमध्ये जागतिक अजिंक्यपद, राष्ट्रकुल आणि आशियाई स्तरावर सुवर्ण पदकाची कमाई करणाºया गौरव शर्मा या स्टार खेळाडूने दिला. भारताचा स्ट्राँगेस्ट मॅन आणि बाहुबली म्हणून ओळखल्या जाणा-या गौरवने नुकतीच ‘लोकमत’ मुंबई कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी या खेळातील आव्हान, संधी यावर चर्चा करतानाच गौरवने युवा खेळाडूंना डोपिंगपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. तसेच ब्रिटन सरकारच्या वतीने हाउस आॅफ कॉमर्समध्ये गौरवचा विशेष सन्मानही करण्यात आला. यापलीकडे गौरव दिल्लीतील एका हनुमान मंदिरात पुजारी असून बजरंग बलीच्या आशीर्वादानेच जगात तिरंगा फडकावू शकलो, असे गौरव अभिमानाने म्हणतो. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली विशेष चर्चा...

तू पूर्णपणे शाकाहारी असून शारीरिक शक्ती कशी मिळवलीस?
माझ्या खेळामध्ये मांसाहार अनिवार्य असल्याचा एक गैरसमज सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. पण तसे काही नाही. शुद्ध शाकाहार केल्यानेही तुम्ही ताकदवान होऊ शकता. शिवाय मी कोणत्याही प्रकारची सप्लिमेंटही घेतली नाही. मी कधीही डोपिंगसारख्या प्रकारात अडकलो नाही. पण मी जडीबुटीचे सेवन करतो. ‘किडाजडी’ नवाच्या जडीबुटीचा एक कोर्स मी करतो. तो खूप महागडा असून भारतीय खेळाडूसाठी ते परवडणारे नाही. या जडीबुटीची किंमत ४२ लाख रुपये किलो आहे. ही सर्वात महागडी जडीबुटी आहे. याचे उत्पन्न भारतात होत असून याचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात आहे.

या जडीबुटीचे महत्त्व काय?
भारतात या जडीबुटीला गांभीर्याने घेतले जात नाही, पण विदेशात याला खूप मागणी आहे. चीनचे ९९ टक्के खेळाडू याचे सेवन करतात. त्यामुळेच आॅलिम्पिकमध्ये त्यांचे वर्चस्व दिसून येते. यामुळे ऊर्जा, क्षमता आणि तंदुरुस्ती कमालीची वाढते. याचा कोर्स हिमाचल प्रदेशात होतो आणि केवळ थंड वातावरणात केला जातो. नियमानुसार याचे सेवन करावे लागते. यामुळेच मी कधी डोपिंगमध्ये अडकलो नाही आणि डोपिंगची भीतीही वाटत नाही.

कुस्ती ते पॉवरलिफ्टिंग हा प्रवास कसा झाला?
माझी सुरुवात कुस्तीपासून झाली. पण पाठीच्या दुखण्यामुळे कुस्ती सोडावी लागली. त्यानंतर मी शरीरसौष्ठवाकडे वळलो. तेथे मी खुल्या राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत सहभाग नोंदवला. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये मी सलग दोन वर्षे दिल्ली राज्य विजेता ठरलो. त्यानंतर काही अंतर्गत राजकारणाचा फटका बसू लागला. माझ्या हक्काचे पदक दुरावू लागले होते. त्यामुळे मी हा खेळ सोडला आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक भूपेंद्र धवन यांच्या मार्गदर्शनाखाली २००५ पासून पॉवरलिफ्टिंग खेळतोय.

युवा खेळाडूंना काय सांगशील?
आज इंटरनेटच्या युगात शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी अनेक औषधे किंवा सप्लिमेंटचा वापर खेळाडू करतात. पण हा शॉर्टकट आहे. अशी अनेक औषधे डोपिंगच्या नियमांनुसार अवैध आहेत आणि एकदा का खेळाडू यात अडकले तर त्यांची कारकिर्द संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे मेहनत करा, त्याला पर्याय नाही.

शाकाहारी होण्यासाठी खेळाडूंना काय संदेश देशील?
हा केवळ मानसिक खेळ आहे. यशस्वी कामगिरीसाठी इच्छाशक्ती असणे सर्वात महत्त्वाचे आहे. हे सर्व काही चवीचे खेळ असतात. खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी मांसाहार करणे गरजेचे आहे, असे नाही. हा केवळ एक गैरसमज आहे. आज अनेक विदेशी खेळाडू शाकाहारी होण्यावर भर देत आहेत. कारण त्यांच्याकडे साक्षरता अधिक असल्याने त्यांना सर्व ज्ञान आहे. शाकाहारमध्ये वेगळीच शक्ती आहे आणि दीर्घायुष्यासाठी शाकाहारी व्हावेच लागेल.

Web Title:  Do not take shortcut, no hard work - Gaurav Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई