‘बांगलादेशला कमी लेखू नका’
By admin | Published: February 7, 2017 04:48 AM2017-02-07T04:48:49+5:302017-02-07T04:48:49+5:30
‘बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक असून, प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक करू नका,’
हैदराबाद : ‘‘बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक असून, प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक करू नका,’’ असा इशारा भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने संघसहकाऱ्यांना दिला आहे.
भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान एकमेव कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध शानदार मालिका विजय साकारला असला तरी पाहुण्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे पुजाराने स्पष्ट केले.
पुजारा म्हणाला, ‘‘बांगलादेश संघ उपखंडात चांगला खेळतो. इंग्लंडविरुद्ध त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. त्यामुळे आम्ही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही. आम्ही २०१६मध्ये चांगली कामगिरी केली, हे विसरता येणार नाही. कामगिरीत सातत्य राखण्यास यशस्वी ठरू, असा विश्वास आहे. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असून, २०१७मध्येही २०१६च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहोत.’’
इंग्लंडविरुद्ध क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे.
पुजारा पुढे म्हणाला, ‘‘रणनीतीबाबत नंतर चर्चा करू. जर आम्ही लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर नक्कीच विजय मिळवू. परिस्थितीला विशेष महत्त्व नाही. कारण उपखंडातील स्थिती एकसारखीच असते. त्यामुळे जो संघ चांगला खेळेल तो संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरेल. आम्ही ज्या वेळी बांगलादेश दौऱ्यावर जातो त्या वेळी अशीच स्थिती असते. त्यामुळे परिस्थितीचा काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. चांगली कामगिरी करणाऱ्या संघाला विजयाची संधी राहील. आमची २०१६मधील कामगिरी बघता या लढतीत आमचे पारडे वरचढ राहण्याची शक्यता आहे.’’ (वृत्तसंस्था)