देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करू- प्रार्थना ठोंबरे
By Admin | Published: July 15, 2016 08:43 PM2016-07-15T20:43:09+5:302016-07-15T20:43:09+5:30
आगामी आॅलिम्पिकसाठी आम्ही पुर्णपणे सज्ज असून आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करुन देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करु
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - आगामी आॅलिम्पिकसाठी आम्ही पुर्णपणे सज्ज असून आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करुन देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करु, असा विश्वास रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या प्रार्थना ठोंबरे (टेनिस), के. श्रीकांत व मनू अत्री (बॅडमिंटन), मनिका बत्रा (टेबल टेनिस) आणि इंद्रजीत सिंग (गोळाफेक) या खेळाडूंनी व्यक्त केला. राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपिचंद यांनीही यावेळी खेळाडू सज्ज असून प्रत्यक्ष सामन्यावेळी होणारा खेळ निर्णायक ठरेल, असे सांगितले.
मुंबईत बीकेसी येथे शुक्रवारी इंडियन आॅइल या सरकारी कंपनीने आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या संस्थेच्या खेळाडूंसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आॅलिम्पिक खेळाडूंनी आपले मत व्यक्त केले. प्रशिक्षक म्हणून आॅलिम्पिकचा मोठा अनुभव असलेले गोपिचंद यांनी सांगितले की, ह्यह्यपुर्वीच्या तुलनेत आत्ताच्या पिढीतील खेळाडूंचे लक्ष्य ठरलेले आहे. आमच्यावेळी खेळाडू इतर जागतिक खेळाडूंशी भेटण्याचा, त्यांच्यासह चर्चा करण्याच्या प्रयत्ना असायचे. पण, आताची पिढी थेट ह्यआम्ही पदक जिंकण्यासाठी आॅलिम्पिकला जात आहोत, असे सांगत आहे. हे खूप चांगले आहे. यावरुन त्यांना काय साध्य करायचे आहे दिसून येते.
त्याचप्रमाणे, यंदाच्या आॅलिम्पिकसाठी भारताने आतापर्यंतचा सर्वाधिक १२० खेळाडूंचा चमू पाठवला आहे. हे निश्चित आपल्या देशाचे एक यश आहे. आज केवळ एक किंवा दोन खेळांमध्ये आपल्याला संधी नसून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळामध्ये भारताला पदकाची संधी आहे. मात्र हे सर्वकाही त्यादिवशी होणाऱ्या कामगिरीवर अवलंबून आहे, असेही गोपिचंद यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी भारतीय हॉकी संघाच्या राष्ट्रीय शिबीरामध्ये व्यस्त असल्याने व्ही. आर. रघुनाथ, कोठाजीत सिंग आणि एस. के. उथप्पा हे हॉकीपटू आणि कोरियाविरुध्दच्या डेव्हीस कप सामन्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने टेनिसपटू रोहन बोपन्ना तसेच टेबल टेनिसपटू ए. शरथ कलम यावेळी अनुपस्थित होते.
.........................................
आम्ही आॅलिम्पिकसाठी सज्ज असून आमच्यापरिने आम्ही सर्वोत्तम खेळ करु. देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करायची असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पदकाचे प्रयत्न सोडणार नाही. तिथे जाणारच आहे तर आपला हिसका दाखवूनंच परत येणार.
- इंद्रजीत सिंग, गोळाफेक