गावस्कर ‘आयसीसी’वर भडकले स्मिथच्या ‘त्या’ कृतीकडे डोळेझाक का?
By admin | Published: March 10, 2017 06:25 AM2017-03-10T06:25:45+5:302017-03-10T06:25:45+5:30
बंगळुरू कसोटीत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने केलेल्या चुकीवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर
नवी दिल्ली : बंगळुरू कसोटीत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने केलेल्या चुकीवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली. एखाद्या देशाला झुकते माप दिले जाते आणि दुसऱ्या देशाला वाऱ्यावर सोडले जाते, अशी भूमिका योग्य नाही, या शब्दांत गावस्कर यांनी आयसीसीला धारेवर धरले.
एनडी टीव्ही या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘भविष्यात स्मिथने केलेली चूक समजा एखाद्या भारतीय खेळाडूकडून झाली, तर मग त्याच्यावरही कारवाई होऊ नये. तिसऱ्या कसोटीत समजा विराट कोहलीला बाद देण्यात आले, तर त्यानेदेखील डीआरएस मागण्याआधी ड्रेसिंग रुमकडे पाहायला हवे. कोहलीच्या या भूमिकेवर आयसीसी आणि मॅच रेफ्री काय कारवाई करतील, हेच मला पाहायचे आहे.’
या घटनेवर वाद उद्भवताच बीसीसीआय आणि आॅस्ट्रेलिया बोर्डाने आपापल्या कर्णधारांची बाजू घेतली होती. आयसीसीने मात्र काल उशिरा रात्री स्मिथ आणि कोहली यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करायची नाही, असा निर्णय घेतला. गावस्कर म्हणाले, ‘आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांना स्मिथच्या इशारा मागण्यात काहीही वावगे आढळले नाही. स्मिथने आयसीसी आचारसंहितेचे धडधडीत उल्लंघन केल्यानंतर ब्रॉड यांना काहीच दिसले नाही, याचे मला आश्चर्य वाटते.’
पंचांनीही स्मिथने केलेली कृती योग्य नसल्याचे म्हटले होते. सामन्यानंतर खुद्द स्मिथनेही झालेली चूक मान्य केली होती. स्मिथच्या कृतीवर आयसीसीकडून कारवाई केली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, आयसीसीने स्मिथवर कोणतीच कारवाई केली नाही. (वृत्तसंस्था)