चेक संघाविरुद्ध चमत्कार घडवू : पेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2015 12:05 AM2015-09-18T00:05:18+5:302015-09-18T00:05:18+5:30
चेक प्रजासत्ताकविरुद्ध भारतीय संघ भक्कम वाटत असून, विश्व प्ले आॅफ लढतीत आम्ही चमत्कार घडवू, असा आशावाद अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : चेक प्रजासत्ताकविरुद्ध भारतीय संघ भक्कम वाटत असून, विश्व प्ले आॅफ लढतीत आम्ही चमत्कार घडवू, असा आशावाद अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने व्यक्त केला आहे.
शुक्रवारी आर. के. खन्ना स्टेडियमवर लढतीला सुरुवात होत असून, गुरुवारी सोडत काढण्यात आली. त्यानंतर पेस म्हणाला, ‘युकी, सोमदेव, बोपण्णा असे सहकारी सोबत आहे. आनंद अमृतराज यांचे मार्गदर्शन आहे. आमचे या लढतीकडे बारकाईने लक्ष असून पहिल्या दिवशी किमान एका विजयाची आम्हाला गरज राहील.’ अमेरिकन ओपनमधील मिश्र दुहेरीचा चॅम्पियन असलेला पेस पुढे म्हणाला, ‘युकीने नुकतेच शांघाय चॅलेंजर जिंकले. सोमदेव फिट आहे. रोहन हा सर्वोत्कृष्ट टेनिस खेळत आहे. प्रत्येकाची स्वत:ची शैली असते आणि तो आपल्या कुवतीनुसार योगदान देतो. सध्या दोन्ही संघांतील खेळाडू दिल्लीची गर्मी आणि वातावरणातील दमटपणा यावर कशी मात करतात यावर यशाचे गणित विसंबून
असेल. अशा वातावरणात
पाच सेटपर्यंत सामना लांबल्यास फिटनेस टिकवून ठेवण्याचे अवघड आव्हान राहील.’
यूएस ओपनमधील हार्ड कोर्ट तसेच आर. के. खन्नाचे हार्ड कोर्ट यावर खेळताना काय फरक जाणवतो, असे विचारताच पेस म्हणाला, ‘मी येथे २६ वर्षांपासून खेळत आहे. अनेक डेव्हिस चषक सामने येथेच खेळल्यामुळे कोर्टचा चांगलाच अभ्यास झाला आहे. ‘हार्ड कोर्ट ते हार्ड कोर्ट’ हा प्रवास कठीण नाही.’
दिल्लीची गरमी भयंकर असल्याचे सांगून पेस म्हणाला, ‘काल सायंकाळी ७ वाजता सराव करताना खूप दमटपणा होता. दिवसा फारच गरम असते. कोर्टवर उसळी असल्याने दीर्घ रॅली अपेक्षित आहेत. यामुळे फिटनेसची कसोटी राहील. युकी आणि सोमदेव दीर्घ रॅली खेळण्यात येथे पटाईत आहेत.’(वृत्तसंस्था)