केनियन धावपटूंचे वर्चस्व; भारतीयांमध्ये पाल बंधू चमकले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 04:47 AM2020-02-10T04:47:35+5:302020-02-10T04:47:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पहिल्या महाराष्टÑ पोलीस आंतरराष्टÑीय मॅरेथॉनवर केनियन खेळाडूनी वर्चस्व राखले. ४२ किलोमीटरच्या आंतरराष्टÑीय पुरुष गटात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहिल्या महाराष्टÑ पोलीस आंतरराष्टÑीय मॅरेथॉनवर केनियन खेळाडूनी वर्चस्व राखले. ४२ किलोमीटरच्या आंतरराष्टÑीय पुरुष गटात त्यांच्या स्टीफन किपचिर्चीने, तर महिला गटात शायलीन जेपकोरीरने विजेतेपद पटकाविले. त्यासाठी त्यांनी अनुक्रमे २ तास १७ मिनिटे ३९ आणि २ तास ४१ मिनिटे व ५८ सेंकदात अशी वेळ दिली.
भारतीय गटात राहुल पाल आणि त्याचा भाऊ अभिषेक पाल अनुक्रमे पूर्ण व अर्ध मॅरेथॉनमध्ये विजेते ठरले. महिला गटात ज्योती गवते व कविता यादव यांनी बाजी मारली. रितू पाल तिसरी आली.
पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच झालेल्या या मॅरेथॉनमध्ये राज्य पोलीस दलातील दीड हजारावर अधिकारी, अंमलदारांसह देशभरातील तब्बल १७ हजार ६०० जण त्यामध्ये सहभागी होते. गेटवे ते बीकेसी व्हाया वरळी सी-लिंक या मार्गावर रंगलेल्या मॅरेथॉनमध्ये अबालवृद्ध सहभागी होते. पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, अप्पर महासंचालक (अस्थापना) संजीव सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी शर्यतीचे संचालक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
पुर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुषाच्या गटात केनियाचे डोमिनिक कांगोर आणि इथिओपियन झीक डेबे यांनी अनुक्रमे द्वितीय व तिसरा क्रमांक पटकाविला. महिला गटामध्ये केनियाची ग्लडिस केंबोई व भारताची ज्योती गवते दुसरी व तिसरी आली.
भारतीय पुरुष गटात राहुल पालने २ तास २९ मिनिटे ४४ सेंकदामध्ये अंतर पुर्ण करीत पहिला क्रमांक पटकाविला. त्याच्याहून केवळ एक सेंकदाने नवीन हूडाला मागे राहिला तर तिसरा आलेल्या सुखदेव सिंगने २ तास २९ मिनिटे, ५३ सेंकद इतकी वेळ घेतली.
महिलांमध्ये ज्योती गवतेने २.५४.१६ अशी वेळ नोंदवित अव्वल स्थान मिळविले. श्यामली सिंग (२.५९.५६) आणि रितू पाल (३.१५.४६) यांनी अनुक्रमे द्वितीय व तिसरी आली. अर्ध मॅरेथॉन कविता यादवने जिंकताना १ तास २० मिनिटे अशी वेळ दिली. किरण सहदेव आणि आरती पाटील द्वितीय व तृतीय आल्या.
मॅरेथॉनवर बहिष्कार
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नागपाडा येथे महिलांनी आंदोलन पुकारले असून आंदोलनाच्या छायाचित्रणाठी गेलेल्या एका छायाचित्रकाराला घटनास्थळावरील पोलीसांकडून धक्काबुक्की, माराहाण झाली होती. त्यामुळे याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात यावी; अशी मागणी छायाचित्रकारांकडून होत होती. मात्र काहीच कारवाई होत नसल्याने या घटनेचा निषेध म्हणून रविवारी या मॅरेथॉनवर बॉम्बे न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशनसह पत्रकारांच्या विविध संघटनांनी बहिष्कार टाकला होता.
सन्मानचिन्हासाठी स्पर्धकांची झुंबड
मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक धावपटूला सन्मानचिन्ह देण्यात आले. मात्र त्याचे वितरणाचे नियोजनात त्रुटी राहिल्यामुळे अनेकांना ती मिळाली नाहीत. वितरणाच्या ठिकाणी गर्दी करीत अनेकांनी स्वत:च्या हाताने ५,५,१०,१० पदके घेवून गेल्याने ती संपली. अखेर विशेष महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी सहभागी पोलिसांनी त्यांच्या पोलीस ठाण्यामध्ये पाठविली जाण्याचे जाहीर करीत राग शांत केला.