डोपमुक्त संजिता चानूला बहाल होणार अर्जुन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 02:24 AM2020-06-26T02:24:30+5:302020-06-26T02:24:34+5:30
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुरस्कार देण्यात येईल, असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्ली : दिग्गज भारोत्तोलनपटू संजिता चानू हिला अखेर २०१८ ला जाहीर झालेला अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेची दोन सुवर्ण विजेती संजिताचा पुरस्कार डोपिंगमुळे रोखण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुरस्कार देण्यात येईल, असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
चानू डोपिंगमध्ये निर्दोष आढळल्यानंतर लिफाफा उघडण्यात यावा, या अटीवर न्यायालयाने पुरस्कारासाठी चानूच्या नावाचा विचार करण्याचे आदेश समितीला दिले होते. चानूला आंतरराष्टÑीय महासंघाने डोपिंगच्या सर्व आरोपातून मुक्त केल्यामुळे आम्हाला न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत अर्जुन पुरस्कारासाठी नावाचा विचार करावा लागेल, अशी माहिती मंत्रालयाच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली.
२०१७ ला अर्जुन पुरस्कारासाठी डोळेझाक करण्यात आल्यामुळे चानूने न्यायालयात धाव घेतली होती. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना २०१८ ला प्रतिबंधित औषध सेवनात ती दोषी आढळली होती. न्यायालयाने त्याचवर्षी आॅगस्टमध्ये चानूच्या नावाचा विचार व्हावा, असे समितीला आदेश दिले. खेळाडू डोपिंगमुक्त होईपर्यंत लिफाफा उघडू नये, असेही बजावले होते. आंतरराष्टÑीय भारोत्तोलन महासंघाने मागच्या महिन्यात चानूवरील आरोप मागे घेतले. मणिपूरची खेळाडू या काळात झालेल्या मानसिक त्रासाबद्दल भरपाई मागण्याचा विचार करीत आहे. आयडब्ल्यूएफने वाडाच्या शिफारशीनुसार चानूला डोपमुक्त केले. त्यानुसार राष्टÑीय महासंघाने क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती केली. चानूला २०१८ चा अर्जुन पुरस्कार देण्यात येईल, या माहितीस भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या महासचिवांनी दुजोरा दिला आहे. (वृत्तसंस्था)
>२६ वर्षांच्या संजिता चानूने २०१४ आणि २०१८ च्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात क्रमश: ४८ आणि ५३ किलो वजन गटात सुवर्णपदके जिंकली. चानूने २०१६ आणि २०१७ यावर्षी दोनदा अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला होता. तथापि दोन्ही वेळा तिच्या नावाचा विचार झाला नव्हता.