डोपिंग प्रकरणामुळे खेळाडूंसोबत देशही त्रस्त होतो: किरेन रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:30 AM2019-12-11T03:30:03+5:302019-12-11T06:08:59+5:30
अभिनेता सुनील शेट्टी ‘नाडा’चा ब्रँड अॅम्बेसेडर
नवी दिल्ली : ‘भारतात डोपिंगचे प्रकार आमच्या चिंतेत भर पाडणारे असून, यामुळे खेळाडूसोबत देशाचीही प्रतिमा मलीन होते. भारतात पारदर्शी क्रीडा संस्कृती रुजविण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजिजू यांनी मंगळवारी केले.
भारतीय खेळाडू विदेशात डोपिंगमध्ये अडकल्यास देशाची नाचक्की होत असल्याचे सांगून क्रीडामंत्री म्हणाले, ‘भारताला पारदर्शी क्रीडा राष्ट्र बनविण्यासाठी डोपिंगमध्ये सामील लोकांना शोधण्याची गरज आहे. दुसरीकडे अजाणतेपणे यात अडकणाऱ्यांना डोपिंगचे दुष्परिणाम समजावून सांगण्याची वेळ आली आहे. डोपिंगची सर्वच प्रकरणे हेतुपुरस्पर केली जातात, असे मी म्हणणार नाही. मात्र काही खेळाडू हेतुपुरस्परपणे हे काम करतात. काही खेळाडू असेही आहेत जे नकळतपणे ड्रग्ज सेवन करतात. यासाठी स्वच्छ खेळाची प्रसिद्धी होण्याची गरज आहे. जे बेसावधपणे डोपिंगच्या आहारी जातात, त्यांची चूक सुधारण्याचे काम सूज्ञ नागरिकांना करावे लागेल.’
अभिनेता सुनील शेट्टी याला राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीचा (नाडा) ब्रॅन्ड अॅम्बेसडर बनविण्याची घोषणा केल्यानंतर रिजिजु यांनी डोपिंगच्या दुष्परिणामापासून खेळाडूंना सावध केले. टोकियो आॅलिम्पिकला केवळ आठ महिने शिल्लक असून, यंदा देशात
मोठ्या प्रमाणावर डोपिंगची प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. रिजिजू पुढे म्हणाले,‘आमचे खेळाडू विदेशात डोपिंगमध्ये दोषी आढळावेत, असे मला अपेक्षित नाही. यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. खेळाडूंची आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्रतीमा मलिन होते.’ यंदा १५० हून अधिक खेळाडू देशात डोपिंगमध्ये दोषी आढळले. त्यात सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू आहेत.
‘देशात पारदर्शी आणि स्वच्छ क्रीडा संस्कृतीचा विकास करावा लागेल. खेळात असे प्रकार क्लेशदायी ठरतात. भारताला क्रीडा महाशक्ती बनायचे असेल तर खेळाडूंनी डोपिंगसारख्या प्रकारापासून दूर राहायला हवे. पारदर्शी खेळ ही काळाची गरज आहे,’ असेही रिजिजू यांनी यावेळी सांगितले.
यशाचा कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही
‘यशासाठी कुठलाही शॉर्टकट असूच शकत नाही. चारित्र्याची निर्मिती हळुवारपणे होते. मी ही मोहीम शालेयस्तरावर राबविण्यास इच्छुक आहे. खेळात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिक मार्गाने जाण्याचा संदेश मुलांना द्यायचा आहे. भारत हा प्रामाणिक देश आहे, असा संदेशही याद्वारे द्यावा लागेल. आमचे अनेक प्रशिक्षक मुलांना वास्तविकतेची माहिती देण्याइतके प्रशिक्षित नाहीत, असे माझे प्रामाणिक मत आहे.’ - सुनील शेट्टी, अभिनेता