डोपिंगच्या प्रकरणाने वेटलिफ्टिंगच्या आठ प्रशिक्षकांवर दोन वर्षांची बंदी
By admin | Published: May 23, 2015 01:12 AM2015-05-23T01:12:49+5:302015-05-23T01:12:49+5:30
स्पर्धांमध्ये प्रतिबंधित औषध सेवनात दोषी आढळलेल्या खेळाडूंच्या आठ कोचेसवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय भारतीय भारोत्तोलन महासंघाने घेतला आहे
नवी दिल्ली : मागील काही महिन्यात विविध स्पर्धांमध्ये प्रतिबंधित औषध सेवनात दोषी आढळलेल्या खेळाडूंच्या आठ कोचेसवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय भारतीय भारोत्तोलन महासंघाने घेतला आहे. डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे असलेल्या दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि मणिपूर या चार राज्य संघटनांवर देखील एका वर्षाची बंदी लावण्यात आली आहे. यंदा एकूण २६ खेळाडू वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये डोपिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळले. सर्वाधिक स्पर्धक यमुनानगर येथे जानेवारीत झालेल्या राष्ट्रीय युवा आणि सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपदरम्यान दोषी आढळले होते. आयडब्ल्यूएफचे सचिव सहदेव यादव म्हणाले, ‘आयडब्ल्यूएफने आठ कोचेसवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.’ तरी वेटलिफ्टर्सवर किती बंदी घालायची याचा निर्णय राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सी(नाडा) घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांची बंदी लावण्यात आली. त्यात दिल्लीचे कोच रवी कुमार, एस. के. बक्षी आणि वीरेंद्र कुमार यांच्यासह मणिपूरचे दोन तसेच मध्य प्रदेश, पंजाब आणि ओडिशा येथील प्रत्येकी एका कोचचा समावेश आहे. राष्ट्रीय युवा आणि ज्युनियर गट स्पर्धेशिवाय आंतर विद्यापीठ, पोलीस क्रीडा तसेच रेल्वे स्पर्धेत खेळाडू पॉझिटिव्ह आढळले होते.
आयडब्ल्यूएफच्या नियमानुसार राज्य संघटनांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. वेटलिफ्टर्सतर्फे प्रत्येकी ५० हजार अतिरिक्त द्यावे लागतील. राज्य संघटनांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांचे खेळाडू वर्षभर कुठल्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. कोचेसना मात्र बंदीचा सामना करावा लागेल. त्यातून त्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही. त्यांच्यावर कुठलाही आर्थिक भुर्दंड लावण्यात आलेला नाही.