डोपिंगमध्ये दोषी खेळाडू, कोचेसना कोठडीची शिक्षा!
By admin | Published: April 28, 2017 02:08 AM2017-04-28T02:08:47+5:302017-04-28T02:08:47+5:30
डोपिंगचा ‘डंख’ भारतीय क्रीडा विश्वात हळूहळू चांगलाच पोखरू लागला आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी डोपिंग ‘गुन्हेगारी’ श्रेणीत
नवी दिल्ली : डोपिंगचा ‘डंख’ भारतीय क्रीडा विश्वात हळूहळू चांगलाच पोखरू लागला आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी डोपिंग ‘गुन्हेगारी’ श्रेणीत आणणे तसेच दोषी खेळाडू आणि कोचेसना थेट कारागृहात पाठविण्याचा सर्वसंमत कायदा करण्यावर
भर देण्यात येत आहे. यासाठी जर्मनी आणि आॅस्ट्रेलियातील सध्याच्या कायद्याचा अभ्यास करण्यात येईल.
केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी काही दिवसांपूर्वी डोपिंगमधील दोषींना थेट कारागृहात पाठविण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती. शालेय आणि विद्यापीठस्तरावर डोपिंंगचे प्रमाण अधिक असल्याने या खेळाडूंना
भीती वाटावी, असा कडक
कायदा अस्तित्वात आणला जात आहे. डोपिंगविरोधी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गोयल म्हणाले, ‘डोपिंगला गुन्हे श्रेणीत आणून दोषींना कोठडीची शिक्षा देण्याचा विचार आहे.’
राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीचे(नाडा) महासंचालक नवीन अग्रवाल हे या वेळी उपस्थित होते.
गोयल म्हणाले, ‘‘आधी राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मर्यादित असलेले डोपिंग आता शाळा तसेच विद्यापीठस्तरावरील स्पर्धेपर्यंत पोहोचले आहे. याला आळा बसण्यासाठी दोषी खेळाडूसोबतच कोच, ट्रेनर आणि डॉक्टर हेदेखील दोषी ठरू शकतील. याविषयी ताबडतोब अटकेचीदेखील तरतूद असेल. अनेकदा खेळाडू अनवधानाने द्रव घेतात. कोचेसच्या चुकीचा फटका खेळाडूला बसतो. कोचेस मात्र
अलिप्त राहतात. नव्या कायद्यात सर्वांना दोषी मानले जाईल. मसुदा तयार करताना विधी मंत्रालय, सीबीआय आणि अमलीद्रव्यविरोधी विभागाचे मत विचारात घेतले
जाणार आहे.’’
सन २०१५च्या वाडाच्या अहवालात डोपिंगमध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावर होता. ११७ भारतीय खेळाडूंना शिक्षा देण्यात आली. सर्वाधिक प्रकरणे रशिया आणि इटलीत घडली. दरवर्षी भारतात सात हजार चाचण्या होत असून, कोचेसनी खेळाडूंना मूर्ख बनवू नये, हा आमचा हेतू असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)