महाराष्ट्राच्या मैदानी खेळास डोपिंगचा डाग

By admin | Published: April 20, 2016 03:30 AM2016-04-20T03:30:52+5:302016-04-20T03:30:52+5:30

महाराष्ट्राची मूळची नागपूरची असलेली लांब पल्ल्याची धावपटू रोहिणी राऊत नॅशनल अ‍ॅँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) २८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत प्रथमदर्शनी

Doping stains in the field of Maharashtra | महाराष्ट्राच्या मैदानी खेळास डोपिंगचा डाग

महाराष्ट्राच्या मैदानी खेळास डोपिंगचा डाग

Next

पुणे : महाराष्ट्राची मूळची नागपूरची असलेली लांब पल्ल्याची धावपटू रोहिणी राऊत नॅशनल अ‍ॅँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) २८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत प्रथमदर्शनी दोषी आढळली असल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या २६ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याचे पडसाद नक्की उमटणार असल्याची चर्चा अ‍ॅथलेटिक्स
क्षेत्रात सुरू झाली आहे. या सभेत काय निर्णय घेतला जातो, याकडे आता राज्यातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंसह पालक, मार्गदर्शक व संघटकांचे लक्ष लागले आहे.
रियो आॅलिम्पिक डोळ्यांसमोर ठेवून देशभरात यंदाच्या वर्षी झालेल्या विविध मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या धावपटूंची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचे नाडाने ठरविले. विजेते धावपटू ज्या शहरात सराव करतात, तेथे अचानक जाऊन विजेत्या धावपटूंचे चाचणीसाठी युरीन नमुने घेतले गेले. २३ मार्च २०१६ रोजी नाडाने रोहिणी राऊत हिला पहिल्या चाचणीत दोषी आढळल्याची नोटीस पाठवली आहे. (हे पत्र नाडाने अ‍ॅथलेटिक्स महासंघ व राज्य संघटनेलासुद्धा पाठवले आहे.) नाडाने या पत्रात असे म्हटले आहे, की २८ फेब्रुवारी रोजी नाडा डोपिंग कंट्रोल आॅफिसर (डीसीओ) आपल्याकडून युरीनचे दोन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. दोन्ही नमुने आपल्यासमोरच वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये सीलबंद करण्यात आले होते. त्यामध्ये ए नमुन्यातमध्ये १९ नोरॉन्ड्रोस्टेरोन (अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईड) हे उत्तेजक द्रव्य (खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करणारे) आढळले आहे आणि त्याचे प्रमाण १२ एनजी/एमएल (नॅनोग्रॅम/मिलिलिटर) एवढे आहे, की जे प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. प्रत्येकाच्या शरीरात २.५ एनजी/एमएल एवढे असतेच. त्यामुळे आपल्यावर बंदीची कारवाई का करू नये, असेसुद्धा या पत्रात म्हटले आहे. या पत्रात असेसुद्धा नमूद केले आहे, की जर या प्रकरणारत आपल्याला काही आपले म्हणणे मांडायचे असेल, तर ही नोटीस मिळाल्यानंतर ७ दिवसांच्या आत (कामकाजाचे दिवस) आपले म्हणणे लेखी स्वरूपात द्यावे.
महाराष्ट्राची पहिलीच अ‍ॅथलीट उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे देशात लांब पल्ल्याच्या शर्यतीत एक वेगळा दबदबा निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राच्या धावपटूंना मान खाली घालण्याची वेळ येणार आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या २६ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबत काय निर्णय घेण्यात येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. या सभेसाठी राज्यातील सर्व जिल्हा संघटनांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी महासंघ व राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवालासुद्धा उपस्थित राहणार आहेत. राज्य संघटना रोहिणी राऊतविरुद्ध काय कारवाई करणार याकडे सर्वांचे
लक्ष राहील.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Doping stains in the field of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.