द्रविडने दिले देशाला प्राधान्य
By admin | Published: July 1, 2017 02:10 AM2017-07-01T02:10:19+5:302017-07-01T02:10:19+5:30
भारताचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविड याने देशाला अधिक महत्त्व देताना भारताच्या ‘अ’ आणि अंडर-१९ संघ प्रशिक्षकपदासाठी
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविड याने देशाला अधिक महत्त्व देताना भारताच्या ‘अ’ आणि अंडर-१९ संघ प्रशिक्षकपदासाठी आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्स संघाच्या प्रशिक्षक पदावरुन राजीनामा दिला. पुढील दोन वर्षांपर्यंत द्रविड भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कार्यरत राहिल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी द्रविडची भारत ‘अ’ व १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर द्रविडने भारतीय क्रिकेटला महत्त्व देताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातून आपल्या पदाचा राजीनामा दिला. याआधी २०१५ मध्ये द्रविडला या दोन्ही संघांच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंनी मायदेशात व विदेशामध्ये चमकदार कामगिरी केली होती.
मार्च २०१६ मध्ये द्रविडला दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले होते. राष्ट्रीय संघासोबत दहा महिने आणि आयपीएल संघासोबत दोन महिने अशा प्रकारचे द्रविडचे करार होते. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारत ‘अ’ संघाने आॅस्टे्रलियामध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेली त्रिकोणीय मालिका जिंकली होती. तसेच, द्रविडच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षांखालील संघानेही चमक दाखवताना २०१६ विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते.
(वृत्तसंस्था)