ड्रॉ चांगला मिळाला, पण स्पर्धा सोपी नाही; ऑलिम्पिक पदकाचा प्रवास आव्हानात्मक - पी. व्ही. सिंधू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 09:27 AM2021-07-10T09:27:48+5:302021-07-10T09:27:48+5:30
रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या सिंधूला महिला एकेरीमध्ये हाँगकाँगच्या एंगान यी (क्रमवारी ३४) आणि इस्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा (क्रमवारी ५४) यांच्यासह ‘जे गटात’ स्थान मिळाले आहे.
नवी दिल्ली : ‘टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मला अपेक्षित ड्रॉ मिळाला. मात्र, असे असले तरी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा प्रवास सोपा नसणार. ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक सामना आव्हानात्मक ठरेल,’ अशी प्रतिक्रिया भारताच्या ऑलिम्पिक पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केली.
रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या सिंधूला महिला एकेरीमध्ये हाँगकाँगच्या एंगान यी (क्रमवारी ३४) आणि इस्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा (क्रमवारी ५४) यांच्यासह ‘जे गटात’ स्थान मिळाले आहे. पुरुष एकेरीत १५ व्या क्रमांकावर असलेल्या बी. साई प्रणीतला ‘डी गटात’ स्थान मिळाले असून यामध्ये नेदरलँड्सचा मार्क कालजोउ (२९ क्रमवारी) आणि इस्रायलचा मीशा जिल्बरमॅन (४७ क्रमवारी) यांचाही समावेश आहे. ‘मला मिळालेला ड्रॉ संमिश्र असून हा ड्रॉ सोपाही नाही आणि कठीणही नाही.
सर्व सामने जिंकण्यासाठी मला पूर्ण योगदान द्यावे लागेल.’ पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकिरेड्डी यांना ‘अ गटात’ संघर्ष करावा लागेल. त्यांच्या सोबत ‘अ गटात’ अव्वलस्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या केविन एस. सुकामुजो आणि मार्कस एफ. गाइडोन या जोडीचाही समावेश आहे.
एकेरी गटातील ४२ खेळाडूंना १४ गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वलस्थानी येणारा खेळाडू बाद फेरीत प्रवेश करेल. बॅडमिंटन स्पर्धेला २४ जुलैपासून सुरुवात होईल.
दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीची उत्सुकता
- सातव्या स्थानी असलेल्या सिंधूने सांगितले की, ‘ऑलिम्पिकमध्ये खेळणारे सर्वच खेळाडू विशेष लयीमध्ये असतात. प्रत्येक सामना महत्त्वाचा असून प्रत्येक सामन्यानुसार योजना बनवावी लागेल. ही ऑलिम्पिक स्पर्धा असून येथे काहीच सोपे नसते.’