भारत-वेस्ट इंडिज सामना अनिर्णित, पाकिस्तान अव्वल स्थानावर
By admin | Published: August 22, 2016 07:18 PM2016-08-22T19:18:24+5:302016-08-22T19:25:16+5:30
वेस्ट इंडिज विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामना पावसामुळे अखेर अनिर्णीत राहिल्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताची पिछेहाट झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
पोर्ट ऑफ स्पेन, दि. २२ : वेस्ट इंडिज् विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामना पावसामुळे अखेर अनिर्णीत राहिल्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भारताचे कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याच्या स्वप्नांवर पावसाने पाणी फेरले आहे. भारत वि. विडिंज यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल न लागल्याने पाकिस्तान कसोटी मालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.
२००० नंतर आयसीसीने कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्मवारी जाहीर करण्यास सुरवात केली. तेंव्हापासून आजपर्यंत पाकिस्तानला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर येता आलं नव्हते पण आज भारत -वेस्ट इंडिजचा सामना अनिर्णित राहीला आणि पाकिस्तानला ती संधी चालून आली. अव्वल स्थानावर पोहचण्यासाठी पाक क्रिकेट संघाला १६ वर्षाचा कालावधी लागला.
भारत आणि वेस्ट इंडिज् यांच्या दरम्यान सुरू असलेला चौथा कसोटी सामना भारताने जिंकला असता तर भारताचे कसोटी रॅकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राहिले असते. मात्र आज सामन्याचा अखेरचा दिवस होता. आणि वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात फक्त दोन गडी बाद झालेले. त्यामुळे पंचानी सामना अनिर्णीत म्हणून घोषित केला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सलग चार दिवस पावसाचे थैमान कायम राहिले. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला.
विंडिजविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली आहे. या मालिकेत भारताने फलंदाजी व गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजीत रहाणेसह रविचंद्रन अश्विन सहाव्या स्थानी यशस्वी झाले. अश्विनने दोन शतक झळकावून आपली चमक दाखवली. तर एका द्विशतकाच्या जोरावर कोहली मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनला आहे.