सराव सामना अनिर्णीत

By admin | Published: September 19, 2016 03:50 AM2016-09-19T03:50:22+5:302016-09-19T03:50:22+5:30

न्यूझीलंड व मुंबई संघादरम्यान तीन दिवसीय सराव सामना अनिर्णीत संपला.

Drawn match | सराव सामना अनिर्णीत

सराव सामना अनिर्णीत

Next


नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या ल्यूक रोंचीने रणजी चॅम्पियन मुंबईविरुद्ध फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये तीन दिवसीय सराव सामन्यात रविवारी अखेरच्या दिवशी शतकी खेळी करीत कानपूरमध्ये भारताविरुद्ध २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. न्यूझीलंड व मुंबई संघादरम्यान तीन दिवसीय सराव सामना अनिर्णीत संपला.
फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत सिद्धेश लाडने (नाबाद १००) शतक पूर्ण केल्यानंतर मुंबई संघाने ११४ षटकांत ८ बाद ४६४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना पाहुण्या संघाने दुसऱ्या डावात ६६.४ षटकांत २३५ धावांची मजल मारली. ल्यूक रोंचीचे शतक न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरले. रोंचीव्यतिरिक्त बीजे वॉटलिंग (४३) याचे योगदान उल्लेखनीय ठरले. मार्टिन गुप्तीलने दुसऱ्या डावातही निराशा केली. तो खाते उघडण्यापूर्वीच माघारी परतला. त्याने पहिल्या डावात १५ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना दुसऱ्या डावात दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही.
न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. गुप्तीलला खातेही उघडता आले नाही. दाभोळकरने त्याला माघारी परतवले. त्यानंतर मिशेल सँटनर सिद्धेश लाडचा लक्ष्य ठरला. ब्रेसवेलला (१७) तुषार देशपांडेने तंबूचा मार्ग दाखवला. हेन्री निकोलस (१) व ट्रेंट बोल्ट (१५) यांना विजय गोहिलने बाद केले. एका टोकाकडून रोंचीने आक्रमक फलंदाजी केली. त्याने ११२ चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार व ३ षट्कारांसह १०७ धावा फटकावल्या. यष्टिरक्षक फलंदाज वॉटलिंगने ८७ चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली. रोंचीची शतकी खेळी वलसांगकरने संपुष्टात आणली. टॉम लॅथमने २५ धावांचे योगदान दिले. नील वँगनर (६) व ईश सोढी (२) यांना मोठी खेळी करता आली नाही. मुंबईतर्फे वलसांगकरने ४१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. गोहिल व सिद्धेश यांनी प्रत्येकी, २ तर दाभोळकर व देशपांडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
त्याआधी, मुंबईने कालच्या ५ बाद ४३१ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सिद्धेश्ने ९९ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व ७ षट्कारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. कर्णधार तारे कालच्या वैयक्तिक ५३ धावांवर रिटायर्ड बाद झाला. वलसांगकरने १० धावा केल्या, तर सुफियान शेख १ धाव काढून धावबाद झाला. मुंबईने ४६४ धावसंख्येवर डाव घोषित केला.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अखेरच्या दिवशीही विशेष छाप सोडता आली नाही. ईश सोढीने २० षटकांत १३२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. ट्रेन्ट बोल्ट व मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
>धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ७ बाद ३२४ (डाव घोषित). मुंबई पहिला डाव (कालच्या ५ बाद ४३१ धावसंख्येवरुन पुढे) : तारे रिटायर्ड बाद ५३, लाड नाबाद १००, वलसांगकर झे. वँगनर गो. क्रेग १०, शेख धावबाद ०१, संधू नाबाद ६. अवांतर (४). एकूण ११४ षटकांत ८ बाद ४६४. न्यूझीलंड दुसरा डाव : रोंची यष्टिचित गो. वलसांगकर १०७, गुप्तील झे. यादव गो. दाभोळकर ००, सँटनर यष्टिचित शेख गो. लाड ०८, ब्रेसवेल पायचित गो. देशपांडे १७, निकोलस झे. शेख गो. गोहिल ०१, बोल्ट झे. डायस गो. गोहिल १५, वॉटलिंग यष्टिचित शेख गो. वलसांगकर ४३, लॅथम रिटायर्ड बाद २५, वँगनर झे. सोनी गो. लाड ०६, क्रेग नाबाद ०२, सोढी झे. दाभोळकर गो. वलसांगकर ००. अवांतर (११). एकूण ६६.४ षटकांत सर्वबाद २३५.

Web Title: Drawn match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.