ब्राझीलचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: June 14, 2016 03:57 AM2016-06-14T03:57:11+5:302016-06-14T03:57:11+5:30
राऊल रुइडियाज याने केलेल्या वादग्रस्त गोलच्या जोरावर पेरुने अनपेक्षित निकालाची नोंद करताना बलाढ्य ब्राझीलला १-० असा धक्का देत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली.
फाक्सबोरी : राऊल रुइडियाज याने केलेल्या वादग्रस्त गोलच्या जोरावर पेरुने अनपेक्षित निकालाची नोंद करताना बलाढ्य ब्राझीलला १-० असा धक्का देत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. विशेष म्हणजे या पराभवानंतर ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आले आहे, तर अन्य एका सामन्यात इक्वाडोरने हैतीचा ४-० असा धुव्वा उडवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
अत्यंत अटीतटीच्या व रोमांचक झालेल्या सामन्यात अखेरच्या १६ मिनिटांत केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पेरुने बाजी मारली. मात्र, या गोलवरून मोठा गदारोळ उठला. स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी ब्राझीलला बरोबरी पुरेशी होती आणि त्यांनी त्याच दिशेने कूच केली होती. मात्र, रुइडियाजने केलेल्या गोलमुळे ब्राझीलचे स्वप्न धुळीस मिळाले.
मध्यंतराला गोलशून्य बरोबरी राहिल्यानंतर ७५व्या मिनिटाला पेरुचा फॉरवर्ड रुइडियाज याने गोलपोस्टच्या जवळून गोल केला. मात्र, यावेळी त्याने हाताचा वापर केल्याचा आक्षेप ब्राझीलियन खेळाडूंनी केला. यावेळी रेफ्रीने आपल्या सहकारी रेफ्रीसह चर्चा करून हा गोल वैध ठरवला आणि याच गोलच्या जोरावर पेरुने बलाढ्य ब्राझीलला बाहेरचा रस्ता दाखविला.
टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, गोल करताना चेंडू रुइडियाजच्या हाताला लागला होता. तसेच रेफ्रीने गोल वैध असल्याचा निर्णय दिल्यानंतरही रुइडियाज जोरजोरात हसत असल्याचे दिसत होते. विशेष म्हणजे, १९८७ सालानंतर प्रथमच ब्राझीलवर या स्पर्धेत साखळी फेरीतच बाहेर होण्याची वेळ आली.
दुसरीकडे इक्वाडोरने दणदणीत विजयाची नोंद करताना दुबळ्या हैतीचा ४-० असा फडशा पाडला. इनेर वालंशिया, जैमी अयोवी, ख्रिस्टियन नोबोआ आणि अंतोनियो वालेंशिया यांनी प्रत्येकी एक गोल करताना इक्वाडोरच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याचवेळी इक्वाडोरच्या जबरदस्त आक्रमणापुढे हैतीचा काहीच निभाव लागला नाही. या विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या इक्वाडोरपुढे अमेरिकेचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)