लिंग प्रकरणामुळे दुती पुन्हा चर्चेत

By Admin | Published: July 5, 2017 01:46 AM2017-07-05T01:46:17+5:302017-07-05T01:46:17+5:30

भुवनेश्वरमध्ये आयोजित आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटू दुती चंदला सहभागी होण्यास एक दिवसाचा

Due to gender issues, discussions again | लिंग प्रकरणामुळे दुती पुन्हा चर्चेत

लिंग प्रकरणामुळे दुती पुन्हा चर्चेत

googlenewsNext

नवी दिल्ली : भुवनेश्वरमध्ये आयोजित आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटू दुती चंदला सहभागी होण्यास एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना आयएएएफने तिच्याविरुद्ध ‘लिंग’ प्रकरणात पुन्हा क्रीडा लवादाकडे (कॅस) जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आयएएएफने आपल्या वादग्रस्त हायपरअँड्रोजेनिज्म नीतीच्या समर्थनार्थ अधिक साक्ष-पुरावे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रीडा लवादाने २७ जुलै २०१५ रोजी दुती व भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ आणि आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघादरम्यानच्या (आयएएएफ) प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अंतरिम आदेश देताना विश्व संस्थेचा हायपरअँड्रोजेनिज्म नियम दोन वर्षांसाठी स्थगित केला होता.
हायपरअँड्रोजेनिक महिला खेळाडूला सामान्य टेस्टोस्टेरोनचा (पुरुष हार्मोनचा स्तर) कामगिरीमध्ये किती लाभ होतो, हे सिद्ध करण्यासाठी आयएएएफला संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
कॅसने दोन वर्षांपूर्वी अंतरिम आदेशामध्ये दुतीचे अपील आंशिक रूपाने स्वीकार केले होते आणि अंतिम निर्णय होईपर्यंत तिला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली होती.
आयएएएफने मंगळवारी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या स्थगित करण्यात आलेल्या हायपरअँड्रोजेनिज्म नियमांबाबत तयार करण्यात आलेला अहवाल प्रकाशित झाला असून २७ जुलै रोजी संपणाऱ्या दोन वर्षांच्या निर्धारित मुदतीपूर्वी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या अहवालानुसार उच्च टेस्टोस्टेरोनची पातळी असलेल्या महिला खेळाडूला कमी टेस्टोस्टेरोनची पातळी असलेल्या महिला खेळाडूंच्या तुलनेत १.८ टक्के ते ४.५ टक्के अधिक लाभ होतो. एएफआयने आयएएएफच्या हायपरअँड्रोजेनिज्म नीतीनुसार २०१४ मध्ये २१ वर्षीय दुतीला अपात्र घोषित केले होते. कारण तिची टेस्टोस्टेरोनची पातळी सामान्य पातळीच्या तुलनेत अधिक होती. दुतीने या नियमांना व तिला निलंबित करण्याच्या एएफआयच्या निर्णयाला सप्टेंबर २०१४ मध्ये आव्हान दिले होते. कॅसमध्ये अपील व सुनावणीसाठी क्रीडा मंत्रालयाने दुतीला आर्थिक सहकार्य केले होते. (वृत्तसंस्था)

कॅसमध्ये प्रकरण मिटेपर्यंत स्थगित राहतील


आयएएएफने पुन्हा एकदा हे प्रकरण पुढे रेटण्याचा निर्णय घेतला आहे. विश्व संस्थेच्या हायपरअँड्रोजेनिज्म नीतीविरुद्ध दुतीचे अपील पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारत आणि विदेशामध्ये अनेक मानवाधिकार कार्यकत्यांनी हे ‘लिंगभेदा’चे प्रकरण असल्याचे म्हटले आहे.
हायपरअँड्रोजेनिज्म नियम कॅसमध्ये प्रकरण मिटेपर्यंत स्थगित राहतील, असे आयएएएफने स्पष्ट केले आहे. विश्व महासंघाने खेळाच्या वरिष्ठ न्यायालयामध्ये धाव घेतली असली
तरी आॅगस्टमध्ये लंडन येथे होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपवर याचा कुठलाही परिणाम
होणार नाही.

Web Title: Due to gender issues, discussions again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.